Pen


PEN 39 : लघुकथा १२ : सल

डोळे उघडले तेंव्हा घड्याळात रात्रीचे २ वाजून गेले होते. गेले चार तास नुसताच तळमळत पडलो होतो. आजची रात्र आणि उद्याचा दिवस मला त्रास देणार याची खात्रीच होती मला ! गेल्या १९ वर्षांचा हा नित्यक्रम ठरून गेला होता. अंथरुणात पडून नुसताच या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडलो होतो. श्वास उगाचंच धपापत होते. छातीवर मणा-मणाचं ओझं असल्यासारखं वाटत होतं. दरवर्षीचा डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना मला खूप त्रास, वेदना देवून जातात. हे दोन महिने माझ्या आयुष्यात कधीच आले नसते तर खूप बरं झालं होतं. एव्हाना खूपच अस्वस्थ वाटू लागलं होतं. बाहेर जशी स्मशान शांतता पसरली होती, तशीच ती माझ्या मनात खोलवर रुतून बसली होती. आणि या भयावह शांततेत माझ्याच हृदयाचे ठोके मला ईरिटेट करत होते. वेळ जाईल तसं मनावर दडपण वाढत जात होतं. दरवर्षी २५ जानेवारीच्या रात्री वाटत, तसं यंदाही वाटलं...जीव देवून रिकामं व्हावं आणि ‘ती’ जिथे कुठे असेल तिथं जावून ‘तिला’ मिठीत घेवून खूप खूप रडावं...तिची माफी मागावी, आणि पुन्हा नव्याने डाव सुरू करावा !

            विचार आणि रात्रीची गणितं वाढत चालली होती. दोघांनीही संगनमतानं आपापसात तह केला असावा कदाचित ! मनातून पश्चातापाची कळ उठली आणि मी अंथरुणात उठून बसलो आणि मग लक्षात आलं,

“अरे बाजूलाच तर बसलीये ती !”

ती नजर रोखून माझ्याकडे पहात होती. ती तशीच होती...१९ वर्षांपूर्वी होती तशीच ! पण मी मात्र वयानं वाढलो होतो. दाढीचे केस पिकू लागले होते. टक्कल पडायला सुरूवात झालेली...ती मात्र तशीच, १७-१८ वर्षांची...गोड, निरागस ! तिच्या गालावरची खळी तश्शीच मोहवणारी, वेड लावणारी ! तिला समोर पाहिलं आणि तिला मिठीत घेण्यासाठी हात पसरले...प्रयत्नही केला पण...भासाला कुणी कवटाळू तर शकत नाहीच ना ! ती माझ्या वेड्या प्रयत्नावर खळाळून हसली आणि बघता बघता नाहिशी झाली, जशी अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेली तशी...

भातुकलीच्या खेळामधली, राजा आणिक राणी...

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी !

खिडकीतून आलेल्या उद्दामखोर वार्‍याच्या मंद झुळुकीसोबत तिचा गंध घरभर पसरला आणि बदल्यात माझ्याकडून माझ्याच डोळ्यातील पाण्याची याचना करू लागला. मीही माझ्या याचकाला निराश न करता कित्येक पाण्याच्या ओंजळी त्याच्यासमोर रित्या केल्या ! पण, जितका रिता होत होतो तितकीच ती माझ्या आत आत रुतत चालली होती.

            १९९८. माझी दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि आईनं प्रॉमिस केल्याप्रमाणं मामाकडं मुंबईला जाण्याचा बेत आखला होता. मुंबईला जाण्याची माझी पहिलीच वेळ आणि इतका लांबचा रेल्वे प्रवासही ! ती सुट्टी माझं आयुष्य बदलवून टाकणार आहे, याची मला कल्पनाच नव्हती. मामाच्या घरी येवून ३-४ दिवस झाले होते. माझ्या मामेबहिणींसोबत दंगा करण्यत वेळ कसा निघून जात होता, कांहीच कळत नव्हतं. एके दिवशी संध्याकाळी जेवल्यावर आम्ही खाली गप्पा मारत फिरत होतो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा निशाला भेटलो. टॅक्सीतून ती आणि तिचे कुटुंबिय उतरत होते. निशा माझ्या बहिणींची मैत्रिण. समोरच्याच अपार्टमेंटमधे रहायची. तिला उतरलेलं पाहून माझ्या बहिणींनी तिच्याकडे धाव घेतली आणि एकमेकीच्या गळ्यात पडल्या.

“अरे यार, कितने दिनों के बाद मिल रही हो ! इस साल कुछ जादाही लंबा व्हेकेशन हो गया ना !”- बहिण

“हां यार...काफी सालों बाद इतने दिन रुके थे सुरत में !” – निशा

त्यांचं बोलणं सुरू असताना मी अवघडून उभा होतो. माझं अवघडलेपण माझ्या बहिणीनं ओळखलं आणि जवळ बोलावलं,

 “अनुप, इससे मिलो, ये निशा...निशा शाह...हमारी बेस्ट फ्रेंड ! और निशा, ये मेरा भाई, अनुप..छुट्टीयों के लिए आया है ।“

“हाय...”-निशा

“हॅलो...”-मी

सुरूवातीला औपचारिक आणि मग अनौपचारिक गप्पांना रंग चढला. तिच्याबद्दल बर्‍याच गोष्टी समजल्या. तिचं यंदाचं १०वी चं वर्ष होतं. तिलाही कविता लिहीण्याची आवड होती आणि मलाही ! झालं, आमची ओळख आणि मग मैत्री व्हायला एवढा एकच धागा पुरेसा होता.

            निशाला पहिल्यांदा भेटलो तेंव्हाही आणि नंतरही मला तिच्याबद्दलच्या कोणत्याच वेगळ्या फिलींग्ज निर्माण झाल्या नव्हत्या मात्र समान आवड असणारी मैत्रिण मिळाली याचं मोठं समाधान होतं. रोज सकाळी क्लासला जावून आल्यानंतर निशा माझ्या मामांच्या घरी यायची. एकमेकाच्या कविता ऐकणं, कधी-कधी जबरदस्तीनं ऐकायला लावणं, हे ठरून गेलं होतं. तिच्या कविता हिंदी किंवा इंग्रजी असायच्या आणि माझ्या मराठी ! तिच्या कविता समजायच्या पण माझ्या कविता समजावून सांगताना माझी उडणारी तारांबळ बघून मनसोक्त हसताना तिला पाहिलं की छान वाटायचं. दुपारभर गप्पा आणि संध्याकाळी मुंबई सफारी !

            खूप कमी वेळात आमची गट्टी खूप छान जमली होती. ५-६ दिवसांतच आमची खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटू लागलं होतं. निशाचा वेळ माझ्या बहिणींऐवजी माझ्यासोबतच जास्त जावू लागला होता. १० दिवस कापरासारखे उडून गेले आणि परतीचा दिवस उजाडला. रात्रीची ८.४० ची महालक्ष्मी होती. नेहमीप्रमाणे दुपारी निशा येईल असं वाटलं होतं पण दुपार टळून संध्याकाळ झाली तरी तिचा पत्ता नव्हता. संध्याकाळी अस्वस्थ वाटून तडक तिचं घर गाठलं,

“बेटा, तबियत ठिक नही है उसकी, सो रही है !”-निशाच्या आई

काकूंकडून गेट वेल सून च्या शुभेच्छा देवून निघालो. पायर्‍या उतरताना मनाची घालमेल सुरू झाली होती. अगदी त्याक्षणीही, मी एका चांगल्या मैत्रिणीला मिस करणार एवढी आणि एवढीच रुखरुख लागून राहिली होती. सामान भरून टॅक्सीत बसल्यावर सहज म्हणून तिच्या घराकडे नजर टाकली. कदाचित भास असावा, पण खिडकीतून लपून कुणीतरी पहात असल्यासारखं वाटलं...निशाच असावी बहुतेक ! तिला एकदाही जाण्यापूर्वी भेटावं वाटलं नाही !? या माझ्या अहंनं डोकं वर काढलं आणि मीही मान फिरवून घेतली.

            दरम्यान २ वर्ष सरून गेली होती. मुंबईहून आल्यानंतर थोडे दिवस “निशा फिव्हर” होता पण तोही नाहिसा झाला. म्हणतात ना, संवाद संपला की नातंही संपून जातं ! तसंच झालं. मी निशाला विसरून गेलो. माझ्या आयुष्यात लिखाणात मश्गूल होवून गेलो. १९९९ चा डिसेंबर महिना. नुकतीच इंटरनेटला सुरूवात झालेली. रेडिफ.कॉम, याहू.कॉम आणि यांना टक्कर देण्यासाठी मार्केटमधे उतरलेली सिफी.कॉम !

इंटरनेटची भुरळ पडून मीही खूप अगोदर माझा ई-मेल अकाऊंट तयार केला होता आणि परिवारातील, नातेवाईकांत सर्वांना तो पाठवून दिला होता. डिसेंबर ९९ च्या एका संध्याकाळी मी इंटरनेट कॅफेत बसून मेल चेक करत असताना एका नव्या मेलवर नजर पडली. “फ्रॉम, निशा शाह”. जवळ-जवळ दोन वर्षांनंतर निशाचे नाव पाहून आनंदही झाला आणि पोटात गोळाही आला. त्यावेळच्या इंटरनेटचा स्पिड नव्हता माहित पण माझं हृदय मात्र १०एम.बी.पी.एस. च्या वेगानं धडधडू लागलं होतं. तिचा मेल ओपन केला आणि कांही क्षणांनंतर सारंच धूसर दिसू लागलं. जाणीव होताच, पटकन खिशातून रुमाल काढून डोळे टिपून घेतले. असं काय होतं त्या मेलमध्ये ?

 “डिअर अनुप,

दोन वर्ष होत आलीयेत ! किती लवकर गेला ना वेळ ! पण खरं सांगू ? हि २ वर्षं माझ्यासाठी २०० वर्षांसारखी गेलीयेत. कित्येकदा वाटलं, तुला पत्र लिहावं, फोन करून बोलावं पण धाडसंच नाही झालं रे. तू जाताना वाटलेलं भेटावं पण मुद्दमच टाळलं. तूही टॅक्सीत बसताना पाहिलं होतंस मला आणि रागानं मान वळवली होतीस ! बालिशपणाच होता सारा !! आत्ताही आपण खूप मोठे झालोय अशातला भाग नाही पण निदान सारासार विचार तर आपण नक्कीच करू शकतो ना ! अनुप, गेल्या दोन वर्षात खूप विचार केला मी. कसला ? सांगते. आपण जेंव्हा पहिल्यांदा भेटलो, भेटी वाढत गेल्या, आपली कविता करण्याची सवय, आवडी-निवडी सारंच सेम होतं. खूप कमी वेळात तू मला आवडू लागलास. पण मेंदू मानायला तयार नव्हता. मनात घोळ होता. हे फक्त आकर्षण, ईनफॅक्च्युएशन तर नाही ना ? कांहीच कळत नव्हतं. गेली दोन वर्षं मी हाच गुंता सोडवायचा प्रयत्न करत होते आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. आय रिअली लव्ह यू. हे समजायला मी दोन वर्षांचा वेळ घेतला, तुला हवा असेल तर तूही घे. आणि हां, माझी जबरदस्ती आहे, असं अजिबात समजू नको प्लिज. तुझ्या उत्तराची पुढची दोन वर्षंही वाट पाहू शकते मी !

-निशा”

            काय आणि कसं रिएक्ट व्हावं, कांहीच कळत नव्हतं. पण तिच्यातला संयम, विचारातील पोक्तपणा यांनी नक्कीच माझ्यावर भुरळ घातली. ती रात्र आणि दुसरा दिवस विचार करण्यात निघून गेला. दुसरे दिवशी संध्याकाळी मीही तिला मेल केला,

“डिअर निशा,

तू लिहीलेलं सारंच कल्पनेपलिकडील होतं...धक्काच बसला म्हण हवं तर ! मलाही तुझा स्वभाव, मॅच्युरिटी आवडते पण, येत्या दोन महिन्यात माझी १२ वीची परिक्षा आहे त्यामुळे सध्यातरी मला कुठेही माझे मन गुंतवायचे नाहीये. पण माझा नकार आहे, असंही समजू नकोस ! फक्त मला वेळ हवाय, प्लिज.

-अनुप”

तिनंही माझी बाजू समजून घेतली. पण त्यानंतर आमचं संभाषण मात्र सुरू झालं. रोजचे मेल पाठवणं, कविता शेअर करणं सुरू झालं. डिसेंबर संपला आणि २००० चा जानेवारीही निम्मा उलटून गेला. तिचा मेल आला की, ती तिच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी सुरतला निघाली आहे. २३ ला जावून २८ ला येणार, तोवर संभाषण करणं शक्य नाही. निशा सुरतला निघून गेली...गेली ती कायमचीच !

            २६ जानेवारी २००० च्या पहाटे सुरतला भूकंपाचा जोरदार धक्का बसला आणि निशा स्लॅब अंगावर कोसळून कायमची निघून गेली !

            पण हे मला तोवर समजलं नव्हतं जोवर तिच्या वडिलांचा मला मेल आला नव्हता. त्यांनी मेलवरून तिच्या मृत्यूची बातमी दिली. त्यांना निशाच्या डायर्‍या मिळाल्या होत्या, ज्याच्यात तिनं माझ्याबद्दच्या भावना लिहील्या होत्या. त्यांनी माझा पत्ता मागवून घेतला आणि तिच्या सार्‍या डायर्‍या पाठवून दिल्या आणि अट घातली, वाचून जाळून टाकण्याची ! तिच्या डायर्‍यांची प्रत्येक ओळ वाचताना ओक्साबोक्शी रडलो होतो.

            तिला मी उत्तर देवू शकलो नाही, हीच सल आजतागायत मला झोपू देत नाही. खूप मोठी अपेक्षा नव्हती तिची ! म्हणून दरवर्षीचा डिसेंबर-जानेवारी महिना मला जगू देत नाही. वाटतं, जीव द्यावा आणि ती असेल तिथे तिला गाठून तिची माफी मागावी आणि होकार द्यावा !

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index