Pen


PEN 40 : लघुकथा १३ : रंगपचमी

“एक्याव ‍ऽ ऽ ऽ ये ऽ ऽ एक्याव ऽ ऽ ऽ”-आसकाटात हागवणीला बसल्याला कुशीचा पोरगा पब्या चंप्यावर हुबा र्‍हात टमरेल हातात नाचवत निगालेल्या एक्याला हाका मारून एका हातानं थांबायचा इशारा करत हुता.

तोंडावर बसल्याली शेणमाशी उडवून लावत एक्या नदर बारीक करून, “क्वोंचा त्यो फुकणीचा हागायचा सोडून हाका मारतुय ?” अशा चेर्‍यानं बगत हुता.

“मायला, ह्येला दिसाय न्हाई वाटतं मी !”-पब्या सोतावरच चरफडत, भसाभसा पाणी वतून चड्डी घालत वर उटला.

“तू हायेस व्हय !”-एक्या

“मग कोण ! काय गड्या हागायला आल्याव वळकच दाकवत न्हाईस की !”-पब्या

“तर ! पंगतीलाच बसाय आलूय न्हवं ! बोल का हाका मारालतास ?”-एक्या

“उद्या रंगपचमी हाय ना...”-पब्या

“मग ?”-एक्या

“मग काय मग येड्या भोकाच्या !”

“अय नाग्या, शिवी द्याचं काम न्हाई सांगतो..”

“याड लागलय काय ? मी कवा शिवी दिली रांड्या !?”

“तुज्या तर आता...”-एक्या त्येची गळपट धरायला म्होरं हुणार त्योच पब्यानं नेमका सूर धरला,

“उद्या हामी समदे, पिंकीच्या गल्लीत जाणार हाय पचमी खेळायला !”

“अन ते का म्हणून ?”

“पचमी खेळायला कुणाच्या बा ची परवाणगी लागतीया का काय !”

“कोन कोन चाललाईसा ?”

“हसन्या, सुर्‍या, चंप्या अन आपलं खोरं बी येणार हाय !”

“खोरं !? खरं ? त्येला कसं काय त्येचा बा सोडालाय तवा ?”

“काय म्हाईत ! सोताच म्हणला, मी बी संगट येणार म्हणून !”

“उद्या किती वाजता जाणार हाईसा ?”

“९ ला ! बग की...ये की तू बी !!”

“उद्या बाभळी खडसायला जायचं हुतं...बानं काम घितलंय !”

“खडस की दुपारनंतर...”

“२ एकरातली हाय..अन बा म्हणालता काम उद्याच सपवायचं हाय म्हणून !”

“काय शान्या, मानूस तुजा अन तूच न्हाईस म्हणल्यावर काय मजा ! बग जमलं तर...न्हाई तर ते खोरं काय चानस सोडत न्हाई बग...! हसन्याला म्हणालता, पयला त्योच तिला रंग लावणार अन रिस्पोन्स इचारनार म्हणून !”

“आयला त्या खोर्‍य़ाच्या !”

“म्हणून म्हणालतो...बग ये जमलं तर ! जावू का ?”

“आता कुटं ? घरला येत न्हाईस !?”

“मर्दा, बोलायच्या गडबडीत हागायचं र्‍हायलंय न्हवं का !”

“जा घाणेरड्या...”

“मी घाणेरडा !? अन तू काय अत्तर लावून घ्याय आलतास काय ? जा शाणा हाईस...जमीव उद्या !”

पब्या जेवड्या जोमात आलता, त्येच्या दुप्पट जोमात निगून बी गेला. एक्या बी घरला जायाला वळला. पर मनात आता घालमेल सुरू झाल्याली. बाला सांगाव तर गांडीव लाता बसणार अन न्हाई तर त्ये खोरं उद्या पिंकीला रंग लावणार अन रिस्पोन्स इचारनार. अन व्हय म्हणली तर त्येला ?

“देवा, काय तर मार्ग काड खरं पन !”-मनातल्या मनात एक्यानं देवाला साकडं घातलं.

एक्या ९वी च्या वर्गात शिकत हुता. झेड.पी.च्या शाळत जायचा. १० कोसाच्या आवारात एकलीच शाळा हुती त्यामुळं शाळत गर्दी बी हुती. त्याच गर्दीतली, पिंकी अन एक्या ! पयली पास्नं दोगंबी एकाच वर्गात. दोगांचा शाळंला जायचा रस्ता बी एकच. दोगांचं बाप पन एकमेकाच्या वळकीचं. पावसाळ्यात न चुकता तिचा बाबा येवून सांगायचा, “जरा जाता-येता पोरगीसोबत येत जा, पावसाळ्याचं दिस हायेत !”

तस त्येच्या समद्या गुरपात एक्या एकलाच जरा त्यातल्या त्यात बरा हुता...बोलाय-चालायला, मदत करायला, शिव्या-बिव्या काय द्येयाचा न्हाइ. त्यामुळं पिंकीच्या बाचा त्यातल्या त्यात बरा भरोसा हुता एक्यावर !

            सुरवातीला बिचकनारी दोगंबी, पावसाळाला जसा जोशात ईत जाईल तस दोगं बी रंगात येत जायाची. शाळला गडबडीनं जाणारी त्येंची पावलं घरला येताना मातूर रमत गमत यायचीत. रस्ता बी बेरकीच हुता खरं हं ! सकाळपारी शाळंला जाताना पळलं तरी सपता सपायचा नाई अन येड्या भोकाचा संद्याकाळी, “ह्ये ‍ऽ ऽ थांब” म्हणलं तरी जीव खाऊन पळायचा. गंमत काय म्हायती हाय करायचीत दोगं बी...? रस्ता जेवडा जोरात पळल तेवडंच पाय वडत दोगं बी चालायचीत ! वर्सं उलटाय लागलीत तशी ही दोगांची खोड त्या उनाड रस्त्याला बी कळलीच अन वैतागून तेनं बी नाद सोडलाच म्हणायचा ! समदी पोरं पावसाळ्याला शिव्या घालायचीत मातूर ही दोगं कवा पावसाळा येतूय ह्येचीच वाट बगायचीत ! मराठीच्या झेल्या मास्तरनं “माजा आवडता रुतू” या ईशयावर निबंद लिवाय सांगितलं का, ह्या दोगांचा एकच ईशय ठरल्याला असायचा, पावसाळा. आत काय ना बाय दोगंबी लिवायचीत खरं, जे लिवाय पायजेल ते मातूर एकमेकाकडं बगून हसून पुसून टाकायचीत.

            समदं ठरल्या बर हुकूम हुईत हुतं. दोगांची वय वाडाय लागल्याली. यत्ता फुडं फुडं निगालेल्या. वय जसं दोगांच्या तोंडा-अंगावर दिसाय लागलं तस मातूर पोरांच्यात चरचा हुयाय लागली. पिंकीवर लाईन मारणारी पाच-धा हुश्शार जाली. वर्गात, शाळंत एक्याची दुसमनी वाडाय लागली. मुद्दाम पोरं कळा काडाय लागली, मास्तरांना चुगल्या कराय लागली. मुतारीच्या भिंती एक्या अन पिंकीच्या नावानं रंगाय लागल्या. पिंकीच्या मैतरणी बी चिडवाय लागल्या, कुणी सल्ला द्यू लागलं तर कुणी पोरांची औलाद किती भाडखाउ अस्ती, हे सांगू लागलं, जेवणाच्या सुट्टीत एकांदी पोरगी मुद्दामच जवळन जाताना मोट्यानं म्हणायची, “आमचं ऊसाचं शेत हाय बरं का ! कोन फिरकत न्हाई !!” अन उगचच टाळ्या मारत फिदीफिदी हसत निगून जायाच्या. पिंकीच्या बी आता ह्ये सारं सवयीचं जालं हुतं. तिला अन एक्याला काय बी फरक पडत न्हवता. संद्याकाळी जाताना ती म्हणायची, “जळत्यात समदे..जळूं देत...आपली मैतरी जगात भारी हाय !”

            दोगांला बी कळत हुतं, ही नुसती मैतरी न्हाई...कायतर येगळीच भानगड हाय ! पन ही भानगड “ती” भानगड असली म्हंजे !? ह्या ईचारानं दोगं बी घाबरून जायचीत. घरात कळलं तर एक्याच्या बानं एक्याला बाभळीला अडकवून चामडी सोलली अस्ती अन पिंकीच्या बानं जळणाला फोडल्याल्या लाकडानं फोडून काडलं असतं ! दोगांच्या मेंदवापरयंत ही गोश्ट पोचत हुती पन मन का काय त्ये मातूर माजूरडं हुतं....आयकायलाच तयार न्हाई ! कवा मेंदवाच्या कलानं तर कवा मनाच्या कलानं समदं बेश्ट चालल्यालं हं..एकदम बेश्ट ! पर ९ वीच्या सुरवातीला खोर्‍यानं शाळंत प्रवेश घितला. र्‍हायाला बी त्येच्या बाला पिंकीच्या गल्लीतच घर घावलं ! आता आली का पंचाईत ! लेटनं शाळंत नाव घातल्यामुळं वह्या मागायला खोर्‍याचं तिच्या घरी येनं-जानं सुरू झालं अन मग वळकी पाळकी वाडल्या. तिची आई “ये पोरा...भजी केल्यात ये खायाला” अन नंतर मग, “पिंक्ये...ह्ये घावन केलंय...जा त्या सचिन ला द्यून ये जा...” हितवर मजल गेल्याली.

            बाकी काय बी म्हना पन खोरं हुतं मातूर हुशार...! त्यो आल्यापास्नं समदे शिक्षक त्येचंच कवतिक अन दाखला द्यू लागले हुते. सुरवातीला त्येच्यावर खूस असनारी पोरं आता त्येच्याव जळाय लागली. एकतर अब्यासात हुशार अन आता तर पिंकीसोबत बी त्येचे लगट वाडाय लागल्याली. तवापास्नं त्येच्या फुड आलेल्या दातावरनं ज्ये काय त्येचं नाव पडलं त्ये मातूर फायनलच ! ह्या टायमाला मातूर काई बेरकी पोरं डाव सादायला बगत हुतीत. कुनी पिंकेबद्दल एक्याला सांगायचा अन कुनी एक्याबद्दल खोर्‍य़ाच्या मनात ईश पेरायला बगायचं. ह्या खेळाला रंग मातूर चडाय लागला हुता. एक्या तर खोरं आल्यापास्नं आतनं धुसमूसत हुता. कवा घावतोय अन कवा एकदा हानतो, असं झालं हुतं तर खोरं मातूर एक्याला जळताना बगून लईच निवांत व्हवू लागला व्हता...त्येला तर आता खात्रीच पटत चालल्याली, “आयला येवडी वर्स पिंकीसोबत असणारा ह्यो घाबराय लागलाय म्हंजे आपली जादू झालीया म्हणायची !” अन त्येच्या वाटण्यात काय चुकी हुती असं बी न्हाई !

            पिंकी बदलली हुती, ह्ये बी तेवडंच खरं हुतं. सारकं तिच्या तोंडात त्या खोर्‍याचच नाव असायचं. पावसाळ्यात बी दोगं खेटून खेटूनच न्हाईतर एकाच छत्रीत जायाचीत. पानी डोचक्याच्या वरन जाया लागलं हुतं. एक्यानं बोलनं टाकलं. सोनं द्यायला अन घ्याला बी त्यो गेला न्हाई. न्यू ईअर आला...गेला, संकरात जाली, वान्ट अ लाईन डे बी गेला ! एक्याच्या टक्युर्‍य़ात आग पसरली हुती. अन आज सकाळ सकाळ बातमी ऐकून तर तिडीकच आली हुती. बाचा मार पडला तरी बाहत्तर ! मनात हिशोब घालत राती एक्या झोपला. निज कुटली यायला...डोळ्यासमूर खोरं अन पिंकी ! कवा पापणी मिटली की दोगं हातात हात घालून फिरताना दिसायचीत तर कवा दोगं लगीन करताना दिसायचीत ! रातभर नुसती तळमळ तळ्मळ !
“अय सुक्काडीच्या का हालायलाईस सारकं झोपणार झोप न्हाईतर जा उलत जा भाईर...निजू दे आमाला !” बाबाच्या दमदार आवाजानं एक्यानं डोळं मिटलं खरं, पन आता त्येचा बा बी पिंकी अन खोर्‍य़ाच्या लग्नात हुभा र्‍हावून अक्षता टाकताना दिसाय लागला. एक्यानं रागानं डोळं उघडलं अन बापावर नजर टाकली ! बा त्येच्या तोंडाच्या समुरच डोळं वटारून बगत पडला हुता,

“काय नाई...पोटात गुडगुड व्हयालंय !”-एक्यानं उसन्या अवसानानं हसत बापाला उत्तर दिलं अन कूस बदलून तोंडावर पांगरून वडून पडून र्‍हायला.

            सकाळी कोंबडा आरवायच्या आदी अंगूळ करून, तेल लाऊन एक्या बाच्या म्होरं हुबा हुता.

“बा...मी दुपारी येतू बाबळी खडसायला...”

“का?”

“मी जाणारेय..”

“कुटं?”

“रंगपचमी खेळायला ?”

“कुणासंगं ?”

“मितरंसंग...”

“एक काम कर...त्येनास्नी बी बोलव खडसायला...तितच खेळा अन मला मदत बी करा. दुपारी पापडी देतो समद्यांना !”

“नगो...कोन न्हाई यायचीत शिवारात...”

“आपण दोगं खेळाव मग...कसं?”

“मला दोस्तांसंग खेळायचाय...”

“तूच कशाला जाया पायजेल मग ? त्येन्ला बोलव की ! तुज्यासंगट आलत तर ते तुजं मैतर नाईतर मग असल्या मैतरांची संगटच नको...”

“बाबा...”

“जीबच खडशीन भडव्या तुजी आता ! मगापास्नं बरं बोलायलोय तर लागला आता चडायला ! गप गुमान चलायचं !”

            एक्याचा जीव खालवर हुत हुता. हुता बाबासोबतच पन  चित्त मातूर कोलगाट्या उड्या खावून पिंकीच्या घराजवळच घुटमाळत हुतं.

“पिंक्ये ये पिंक्ये...नगो गं त्येला व्हय म्हणू...जीवच जाईल बग माजा...” एक्या मनातल्या मनात तिला ईनवनी करत हुता.

“तात्या, किती वाजलं म्हणायचं ?” जवळनं जाणार्‍या मानसाला एक्यानं इचारलं.

“धा !”

आता मातूर हुरदय उसळ्या माराय लागलं.

“आयला, पोचली असतील सगळी. आत्तापतूर इचारलं बी असल त्या खोर्‍यानं. व्हय म्हणली तर सगळच सपलं अन न्हाय म्हणली...न्हाय म्हणणारच न्हाई ती !”

एक्याच्या पोटात गोळा आला अन गोळ्य़ा मागूमाग कळ. पोटाला हात धरून एक्यानं पळ काढला.

“एक्या...कुटं पळालाईस ?”- बानं घुश्यानं इचारलं.

“पोटात कळ आलीया...जाऊन येतो...”

“बेनं !”

            एक्या पळाला ते गावच्या दिशेनं. छाताडात आदीच धडधडालतं अन त्यात पळल्यावर तर आगीनगाडीपेक्षा जोरकसच धाडधाड व्हवू लागल्यालं. गावातल्या एका चौकातल्या कट्ट्य़ाजवळ हसन्या, पब्या, सुर्‍य़ा, चंप्या गोल करून हुबी हुतीत. एक्यानं जरा दम खाल्ला अन त्येंच्याजवळ गेला. तितं गेल्यावर त्येचं डोळं मोट्ट जालं. मदी बसून खोरं मोटमोट्यानं रडत हुतं. त्येला रडताना बगून एक्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या,

“जिरली बेन्याची !” मनातल्या मनात त्वांड पसरून एक्या हसला.

“काय झालं रं ?”-एक्यानं आपला आनंद लपवत इचारलं.

अचानक एक्याला बगून समदेच चरकले. खोर्‍याला काय दुक्काचं भरतं आलं काय म्हाईत पन, हात पसरून त्येनं एक्याला हाक मारली, “एक्या ‍ऽ ऽ ऽ“

एक्याला काय समजंना. समदे गंबीर. खोर्‍य़ाला हात पसरल्यालं बगून एक्या फुडं जाला अन उकळ्यांला आवरत त्येला मिटीत घितलं,

“हां गप गप...हां...बास...बास...आवर सोताला...”-एक्या लई खूस हुता.

त्येला आवरताना बगून समदे अजूनच जवळ गोळा जाले. समद्यांनी एक्याच्या खांद्यावर हात ठिवला,

“एक्या, लई मोटं मन हाय बग तुजं...”-पब्या

“ते व्हय खरं जालं काय ?”-एक्या

त्येच्या प्रशनावर खोर्‍याला लईच ऊपाळून आलं. आणकीनच घट्ट मिटी मारत खोर्‍या वराडला,

“एक्या...समदं सपलं रं...आपली पिंकी सोडून गेली आपल्याला !”

“अय फुकणीच्या काय बोलालाईस ?”-एक्या

“एक्या लेका, पिंकीला बगायला आल्यालीत सकाळी. साकरपुडा करूनच गेलीत !”-पब्या

लई येळ शांतता.

मग जे काय एक्याचा बांद फुटला ते फुटलाच. खोर्‍या अन एक्या दोगं एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रडत हुतीत.

            पिंकी लगीन करून निगून गेली. १०वीचं वरीस तिच्याबिगर सूनं-सूनंच वाटत हुतं. इतकं दिवस एकमेकाला पाण्यात बगणारी पक्या अन खोरं आता एका बेंचावर बसाय लागलीत. पावसाळा बी तसा आवंदा लवकरच आला. रस्ता बी त्योच हुता...पाऊस बी त्योच हुता...छ्त्र्या बी त्याच हुता फकस्त आता, एकाच छत्रीत एक्या अन खोरं एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून पिंकीच्या आटवणी काडत चालायचीत

अन दोगं बी एकदमच म्हणायचीत, “आयला ह्या रंगपचमीच्या !!!”  

 

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.

Pen Image

Pen Index