Pen


PEN 41 : लघुकथा १४ : अन-नोन सेव्ह्ड नंबर

दि. ११ ऑक्टोबर २०१९, शुक्रवार

ठिकाण : सेक्टर ११, वाशी, नवी मुंबई

वेळ : रात्रौ २.३०

 

“बरं ऐका ना, येताना सुधासाठी खारी घेवून या...ठिक आहे, ठेवू ?”

“ठेव”

“बरं ऐका ना, मिळाली तर एखादी मेथीची पेंडी नाहीतर पालक घेवून या...”

“आणखी कांही ?”

“नाही ! लवकर या...”

“ठेवू ?”

“हो...”

“बरं....”

“अहो...एक मिनीट...एक मिनीट”

“आता काय कटकटये ?”

“मी कटकटये ?”

“नाही बाई...बोल लवकर, ऑफीसमध्ये आहे मी !”

“असं काय एकदम तुसड्यासारखं ?”

“बोल ना गं बाई...काय हवंय सांग पटकन...”

“राहू दे ! नकोच कांही आणायला...बघते माझं मी..”

“ठिक आहे...”

“जरा म्हणून कांही वाटत नाही...”

उगाच शब्दाला शब्द वाढायला नको म्हणून मी लगेच फोन कट केला पण कट करण्याची रिस्क घेण्यागोदरच, घरी गेल्यावर येणार्‍या भूकंपाची चाहूल लागल्यानं, रिश्टल स्केलची आकडेवारी करून मी मनाची तयारी केली होती. मी मान वर काढली तर समोर रित्या केबिनेटवर हनुवटी ठेवून फटीतून डोकावून तमाशा पाहील्याच्या अविर्भावात बत्तीशी दाखवून डोळे मिचकावून, भुवया उडवून, “मग, आजही दंगा आहे म्हणा !” असे प्रश्न थोबाडावर गिरवून पहात होता. तो बोलायला बत्तीशी उचकटणार तोच त्याला दम देण्याचं अवसान आणून मी माझं तोंड उघडणार तोच पुन्हा फोनची रिंग वाजली. “आमच्याच महामायेचा फोन !” असा विचार येवून, रित्यावरची नजर अजिबातच न हलवता तितक्याच कॉन्फिडन्सने मी फोन उचलला,

“काय गं ! माझं मी मॅनेज करते म्हणाली होतीस ना ? मग काय झालं पुन्हा फोन करायला ? होत नाही माझ्याशिवाय मॅनेज ? लागली ना गरज ? मग कशाला तोंड पसरून बोलायचं !”

पलिकडून शांतता.

“बोल की आत्ता का दातखिळ बसली !”

“तुला फोन करून त्रास दिल्याबद्दल रिअली सॉरी...! अरे म्हंटलं बरीच वर्षं झाली फोन करून, आवाज तरी ऐकूया, म्हणून फोन केला. पण खरंच सॉरी, मी असं अचानक फोन करायला नको होतं...निदान एखादा मेसेज टाकून मग बोलायला हवं होतं. पण, बरं वाटलं...तुझ्याकडे माझा नंबर आजही सेव्ह आहे...”

मी मोबाईलवर नजर टाकली. अननोन नंबर होता.

 “आजही तितक्याच हक्काने बोललास...मनात कांही न ठेवता, थॅंक्स फॉर दॅट आणि हो, मी नाही करणार फोन परत तुला...पण तुला कधी बोलावंस वाटलं तर मात्र नक्की कर...वाट बघतीये !” 

फोन कट झाल्याचा टोन. रित्या अजूनही तसाच पहात होता पण माझा बदललेला चेहरा बघून तोही गंभीर झाला आणि त्याच्या क्युबिकलच्या खुर्चीत बसला. मी मात्र अजूनही फोन तसाच हातात ठेवून अजूनही विचार करत होतो, ‘नक्की कुणाचा होता हा नंबर ?’

 

ती दुपार आणि संपूर्ण संध्याकाळ “नक्की कुणाचा फोन होता ?” या विचारातच सरली. शाळेपासून ज्या-ज्या मुलीवर माझा क्रश होता, ज्या मुली माझ्यावर मरतात असा तेंव्हा जो कांही मला भ्रम झाला होता, अशा मुली किंवा मैत्रिणीही कारण, कदाचित मैत्रीत एखाद्या मुलीने ‘मैत्री तुटू नये’ या विचाराने विचारण्याचे धाडसच केले नसेल तर अशा मला वाटलेल्या...“भावलेल्या” मैत्रिणींची नावं, त्यांचे आवाज आठवून आठवून डोकं भणाणून गेलं होतं. बरं, तो जमाना स्मार्ट फोनचाही नव्हता. मी ज्या काळाबद्दल बोलतोय तो २००५ किंवा २००६ चा काळ असावा कदाचित किंबहुना एखादे वर्ष मागे-पुढेच ! आणि आज वयाची ४५ शी उलटून गेली तरी ही गोष्ट मी विसरूही शकत नाहीये आणि कुणाशी शेअरही करू शकत नाहीये, म्हणूनच म्हंटलं आज डायरीतच रितं व्हावं ! तसंही बर्‍याच दिवसांनी घरापासून लांब ऑफीसच्या कामानिमीत्त इथं वाशीत आलो आहे. आणि इथं कंपनीच्या फ्लॅटमध्ये कुणी डिस्टर्ब करायला नाही. घरी असतो तर, अजून का जागे ? काय झालंय ? कांही होतंय का ? काय लिहीताय ? सारख्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं असतं. आज “मला” डिस्टर्ब करायला कुणी नाही. बर्‍याच दिवसात स्वत:शी मनमोकळेपणाने बोललोच नव्हतो. पण, आज अचानक त्या अननोन नंबरची आठवण का यावी ? कदाचित वाशीत आलोय म्हणूनच “त्या” घटनेची प्रकर्षाने आठवण झाली असावी आणि म्हणून डायरी उघडून लिहायला बसलोय.

 

त्या दिवशी रात्री जेवण्यात माझं लक्षंच लागत नव्हतं. माझ्या सौच्या आणि ५ वर्षांच्या वाणीलाही माझ्यातला बदल जाणवला होता. हिला वाटत होतं, दुपारच्या प्रकरणामुळे मी अबोला धरलाय की काय ! शांतता न सहन होवून अचानकच ती मोठ्याने म्हणाली,

“अहो सॉरी ना...! बास ना हा अबोला !! आल्यापासून शांत आहात...बोला कांहीतरी...शिव्या घाला, भांडा ना माझ्यासोबत...जेवणातल्या निदान चुका तरी काढा हो...! सॉरी म्हणालेय ना मी...”

इतक्या वर्षांच्या संसारात पत्नीकडून सपशेल माघार पाहून मी आवाकच झालो. ‘आयला हा फंडा अगोदरच कळायला हवा होता ! उगाचंच मी मुर्खासारखा बडबड करायचो !’

तिच्या प्रश्नांना उगाचच बेफिकीरीचा आव आणत बगल दिली आणि जेवण संपवून उठून टेरेसवर गेलो. जेवण आणि विचार यांचं नीट पचन व्हावं या उद्देशानं शतपावली सुरू केली खरी पण नेहमी यावेळी ओठांवर गुणगुणण्यासाठी आपसूक येणारी ८० च्या दशकातली गाणी असोत वा मधूर आठवणी असोत आज कुणीच फिरकत नव्हतं. वरून उगाच रस्त्यावर नजर टाकली. ओस पडलेल्या रस्त्यांवर टवाळकी कुत्री आणि पोरं यांच्याशिवाय कुणाचाच मागमूस लागत नव्हता. वातावरण उगाच जडसर झाल्यासारखं वाटत होतं. असंच होतं ना बर्‍याचदा, जसा आपला मूड असतो तसंच आजूबाजूचं वातावरण वाटत रहातं !

                 वेळ जाईल तसं, वार्‍याच्या गार...शांत, शितल झुळुकीसोबत मीही शांत होवू लागलो. सार्‍या अकारण माजलेल्या गोंधळाला, विचारांना हेतूपुरस्सर बाजूला ढकलून आपसूकच, “अभी ना जाओ छोड कर...के दिल अभी भरा नही...” च्या ओळी ओठांवर रुंजी घालू लागल्या. पायर्‍या उतरताना,

‘असेल एखादा चुकून आलेला रॉंग नंबर किंवा कदाचित क्रॉस कनेक्शन झालं असेल !’

“के दिल अभी भरा नही....अभी ना हं हं...हंहंहं...के...हं...हंहं...भरा नही !”-शेवटची पायरी उतरत असताना खिशात मोबाईल व्हाएब्रेट झाला. फोन हातात घेवून बघितला. मेसेज होता...अन-नोन नंबरवरून.

‘नक्कीच हा क्रॉस कनेक्टेड कॉल नव्हता !’-मनात गुदगुल्या.

‘मग कुणाचा होता ?’-पोटात गोळा.

“ओपन” ऑप्शनवर माझं बोट होतं मात्र ते क्लिक करावं की करू नये यात गोंधळ उडाला होता. माझी नजर ब्लॅक-व्हाईट स्क्रिनवर खिळलेली.

“अहो...असे काय पुतळ्यासारखे उभे आहात...”-हिचा आवाज कानावर पडला पण तो मेंदवापर्यंत जायला थोडा वेळ गेलाच आणि जेंव्हा गेला तेंव्हाही माझ्या चेतासंस्थांनी क्रियेला प्रतिक्रिया द्यायला सपष्ट नकार दिला. आणि हेही तेंव्हा लक्षात आलं जेंव्हा माझ्या सौ ने माझ्या पोटावरच्या वळकटीला आपल्या “नाजूक” बोटांनी चिमटल्यावर.

            रात्री बराच वेळ मी आमची ही झोपण्याची वाट पहात होतो. पण आजच आमच्या महामायेला बोलण्याची हुक्की का म्हणून आली होती, कुणास ठाऊक ! बोलून बोलून घसा दुखू लागल्यावर,

“मी मुर्ख म्हणून बोलतीये तुमच्यासोबत ! तुम्हाला काय त्याचं !? जावू दे...आपली कुणालाच किंमत नाही तर उगाच तोंडाची हवा फुकट का म्हणून वाया घालवा ? झोपते...”

“गुड नाईट !!!”-एवढा शब्द मात्र मी मोठ्या आनंदानं उच्चारला आणि तेवढाच आनंद माझ्या थोबाडावर पसरल्याचं, आमच्या हिच्या ऊंचावलेल्या भुवया पाहून एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. मोठ्या मुश्किलीनं मी खोटी जांभई देत, “खूपच कंटाळा आलाय गं...” असं म्हणून तोंड फिरवून जीभही चावली आणि तोंडावर पांघरुण ओढून घेतलं. सारा “आजूबाजूचा परिसर-माहोल” शांत झाल्याचा कानोसा घेवून अत्यंत शिताफीने विजारीच्या खिशात ठेवलेला मोबाईल बाहेर काढला, पहिल्यांदा व्हायब्रेट सुरू असल्याची खात्री केली आणि त्या अन-नोन नंबरचा मेसेज ओपन केला,

“हाय, मी तुझी माफी मागायला मेसेज केला होता. आज सकाळी अचानक माझा फोन बघून तू गोंधळून गेला असणार याची खात्री होतीच मला पण सर्वात मोठा धक्का तर तू दिलास मला ! खरं सांगायचं तर, तुला कितपत धक्का बसलाय माहित नाही पण, तुझी रिएक्शन बघून ना मलाच जास्त धक्का बसलाय ! मी दोन गोष्टींसाठी तुझी माफी मागायला फोन केलाय..एकतर आज सकाळबद्दल आणि, तेंव्हा मी तुझ्यासोबत तसं वागायला नको होतं ! खरं तर भेटूनच तुझी माफी मागायची होती. तू अजूनही पुण्यातच असतोस ना ? मी वाशीत असते. भेटूयात ? निदान एकदा...समोरासमोर भेटून बोलूयात ? प्लिज ?? मी वाट बघेन मैथिल ! गुड नाईट.”

“मैथिल !? आयला हा मैथिल कोण आता ? अच्छा...अच्छा म्हणजे हा नक्कीच रॉंग नंबर होता तर....! आयला ह्या नंबरच्या....”-रागारागाने मेसेज डिलीट करून, स्वत:लाच चार-दोन शिव्या हासडून जबरदस्तीने डोळे आणि विचार बंद करून झोपी गेलो.

            त्यानंतर पुढचे ७-८ दिवस सातत्याने तिचे मेसेज येत होते. सुरूवातीला मुद्दामच डोळेझाक केली पण एके दिवशी एक मेसेज आला,

 “सॉरी, मी तुला खूप त्रास दिलाय आणि आत्ताही देतीये...! तुला भेटायचं नसेल, मेसेजना रिप्लाय द्यायचा नसेल तर, ईट्स ओके पण, माझ्या बकेट लिस्ट मधील ही शेवटची इच्छा होती, तुला भेटून किंवा बोलून तुझ्याशी माफी मागण्याची !”

‘बकेट लिस्ट !? शेवटची इच्छा ??’ घोळ कांही सुटेना. शेवटी या मैथिलची माहिती काढण्याचं ठरवलं. भेटून, ‘बाबा रे, त्या पोरीला भेट आणि काय एकदाचा तो सोक्ष-मोक्ष लावून टाक बघू’, असं म्हणावं वाटू लागलं. ओळख ना पाळख पण त्या पोरीबद्दल जिव्हाळा वाटू लागला होता. तिची त्याच्याबद्दलची ओढ लक्षात येत होती. एकदा वाटलं लावावा फोन अन सांगून टाकावं, ‘बाई गं, हा काय तुझ्या मैथिल-बैथिल चा फोन नाही. उगाच मला फोन करून त्रास देवू नको’, पण म्हंटलं ‘बिचारीला तेवढंच समाधान की कोणीतरी पलिकडे तिचा मैथिल आहे, जो तिचे मेसेजीस वाचत आहे.’

            माहिती काढायची, काढायची म्हणत पुन्हा एक आठवडा गेला. तिचा एकही मेसेज नव्हता आला, त्यामुळे सहाजिकच मीही विसरून गेलो. रविवारच्या भर दुपारी मटनावर आडवा हात मारून, सेट-मॅक्सवर “सुर्यवंशम” चित्रपट, डोळ्यात पाणी आणून बघत असतानाच मोबाईल वाजला. कांहीशा अनिच्छेनेच मोबाईलवर नजर टाकली आणि गडबडीने फोन उचलला.

“गुडबाय...फॉर-एव्हर”-तिचा मेसेज होता.

सोफ्यावरून टाणदिशी उडी मारून मी खोलीत धाव घेतली आणि जुनी डायरी काढून एक नंबर शोधला.

“सच्या....! अरे मी...दिलीप...दिल्या रे....हॉस्टेल नंबर ३, रुम ४१....हां...हां....लेका, इन्स्पेक्टर झाल्यावर काय विसरलासच की ! हो रे...खूप महत्वाचं काम होतं...म्हणून तुला तुझ्या सुट्टीच्या दिवशी त्रास दिला. भेटू शकतो ? हो, चालेल. सिटी प्राईड, कोथरूड. ६ वाजता. डन”

सच्या आणि मी एकाच हॉस्टेलवर होतो...विंग-मेट ! भारी गट्टी होती आमची. मला आठवतंय, एका रंगपंचमीला वर्गणी काढून आख्ख्या पूर्ण बारडीत १२ तुंबे रिकामे केले होते. जो येईल तो पेला पेला पिवून जात होता. असे एका ना हजार गजब प्रकार केले होते मी आणि सच्याने मिळून. लेकाचा आता कोथरूड पोलिस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून लागला होता.

            त्या दिवशी बर्‍याच वर्षांनी सच्या आणि मी भेटलो. जुन्या आठवणी निघाल्या. मग बैठकीचा प्लानही ठरला. बसल्यावर मात्र मी झाला प्रकार सांगितला आणि मला त्या मैथिलचा पत्ता शोधून द्यायला आणि त्या अन-नोन नंबरची माहिती काढून द्यायचीही विनंती केली. सच्याने तातडीने एक-दोन नंबर फिरवून सायबर-सेलच्या प्रमुखाचा नंबर मिळवला आणि त्याला त्या कामावर जोडून दिला.

“बारडीतल्या दारूला जागलास मित्रा !” या माझ्या भावपूर्ण वाक्यावर त्यानंही पेला उचलून,

“चिअर्स फॉर ओल्ड डेज”-त्याने टोस्ट कॉल दिला.   

सकाळी ६.४५ वाजताच सच्याच्या कॉलने जाग आली.

“दिल्या, त्या मैथिलचा पत्ता मिळाला. अरे तुझ्या अगोदर हा नंबर त्याचा होता. त्यानं नंबर बंद केल्यावर तो तुला मिळाला.”-सच्या

“अच्छा, मग रहातो कुठे हा मैथिल ?”

“माऊली सोसायटी, विठ्ठल मंदीराजवळ, कर्वेनगर”

“तिचं नाव ?”

“आशना. तू म्हणाला होतास, ती वाशीला रहाते पण तिचा पत्ता तर माऊली सोसायटीचाच आहे.”

“हो ? ठिकये. बघतो. बाय.”

“रात्री भेटू...गारवा बार...लेका, तो राजाराम ब्रीज क्रॉस केलास की राजाराम चौकातून लेफ्ट घे...बेस्ट जागाये..भेटू संध्याकाळी. बाय.”

             बेल वाजून बराच वेळ झाला होता. मी वळणार तोच दारामागून पाऊले वाजली. मी पुन्हा नीट उभा राहिलो. दरवाजा किलकिला झाला.

“येस ? कोण हवं होतं ?”-दारात पस्तीशीच्या आसपासची एक विवाहीता उभी होती.

“मैथिल इथेच रहातात का ?”

“हो. आपण ?”

“मी दिलीप राहुरीकर. थोडं भेटायचं होतं, काम होतं !”

नाव ऐकल्यावर तिनं पूर्ण दरवाजा उघडला.

“एक मिनीट हं !”-दारातच थांबवून ती आत निघून गेली. मीही तसा पक्का पुणेकर झालो असल्यानं या आदरातिथ्याला सरावलोच होतो. कांही क्षणात मैथिल माझ्यासमोर उभा होता. तोही साधारण पस्तीशीच्या आसपासचाच वाटत होता पण अकाली टक्कल आणि चिंताग्रस्त चेहरा यामुळं एजीड वाटत होता.

“बोला...”

“मला बोलायचं होतं...आशनासंदर्भात..”

तो डोळे फाडून माझ्याकडे पहातच राहिला. त्याच्या अंगाला कंप सुटला.

“आशनाबद्दल तुम्हाला कसं माहित ? तुम्ही ओळखता तिला ? तुमची कशी ओळख ?”-त्यानं प्रश्नांची सरबराई सुरू केली. तो गोंधळून आणि घाबरून गेला होता. पण का ?

“ओह सॉरी, आपण आत बसून बोलूयात...या ना...”

            आम्ही आमोरा-समोर बसलो होतो. कुणीच कांही बोलत नव्हतं. पण ती दोघं नवरा-बायको मात्र थरथरू लागली होती. एकमेकाकडं चोरट्या नजरेनं पहायचीत आणि माना खाली तर कधी समोर पहायचीत.

“सॉरी...म्हणजे मी हा विषय काढून तुम्हाला अनकम्फर्टेवल फिल करून दिलं असेल तर सो सॉरी. पण कसंय ना की गेल्या कांही दिवसांपासून मला आशनाचे मेसेजीस येवू लागलेत...डोन्ट गेट मी रॉंग वे बट, त्यात मैथिल असाच उल्लेख असायचा...कदाचित तुमचा जुना नंबर असावा. काल त्यांचा शेवटचा “गुडबाय फॉर-एव्हर” असा मेसेज आला म्हणून मी शोधत इथवर आलो.”-माझं बोलून होतं न होतं तोच मैथिलला हुंदका फुटला. लहान मुलासारखा बायकोच्या खांद्यावर डोकं टेकून हमसून हमसून रडू लागला. त्या बिचारीची तारांबळ उडली होती. तिच्याही नजरेत पाणी होतं. बर्‍याच वेळानं त्यानं स्वत:ला सावरलं.

“तुम्हाला वेळ आहे ?”

“हो”-मी

“चला..”

“कुठे ?”

            धन्वंतरी हॉस्पिटलच्या दारात गाडी आली. मघापासून त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर शांत बसून अवघडून गेलो होतो. त्या दोघा नवरा-बायकोनेही मागच्या २० मिनीटांच्या प्रवासात एक शब्दही माझ्यासोबत राहूच द्या पण एकमेकासोबतही काढला नव्हता. यावरूनच कांहीतरी गंभीर प्रकरण आहे, याची कल्पना मला आली होती. त्यांच्या मागोमाग मी आय.सी.यु.च्या दारात गेलो. मैथिलने डोकावून पहायला सांगितलं. मी काचेतून पलिकडे पाहीलं. त्याच्या बायकोच्या वयाचीच एक युवती खॉटवर ऑक्सिजन मास्क लावून बेशुध्दावस्थेत पडली होती. शरीराला बरीच उपकरणं जोडली होती.

“डॉक्टरांनी हिच्या जगण्याची खात्री नाही दिलीये..”-तो

“कोण ही ?”-मी

“आशना”-त्यानं स्वत:ला सावरून उत्तर दिलं.

 “पण ती वाशीला...”

“आशना वाशीला रहायची. मी शिकायला मुंबईला होतो. आशना आणि मी एकमेकांवर कॉलेजपासून प्रेम करायचो. कॉलेज संपलं. करिअरही सेटल होवू लागलं होतं. मी हिच्या वडिलांकडे लग्नासाठी मागणी घातली. त्यांनी नकार दिला. आपण पळून जावून लग्न करूया म्हणून मागे लागली होती आणि मला पळून जावून लग्न करायचं नव्हतं. आमच्यात वाद होवू लागले. तिच्या घरचेही तिला टॉर्चर करू लागले. ती मलाअ इमोशनल ब्लॅकमेलिंगचे मेसेजिस पाठवू लागली. असाच एक शेवटचा तिचा मेसेज आला, “गुडबाय फॉर-एव्हर” म्हणून आणि दुसरे दिवशी तिच्या वडिलांचा फोन आला की, आशनाने बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या करण्य़ाचा प्रयत्न केला. त्यावेळी ती वाचली पण, ती त्यावेळच्या कांही क्षणांतच कायमची कैद झाली. त्या अगोदरचं आणि नंतरचंही तिला कांहीच आठवत नाही. या घटनेला १० वर्षं होवून गेलीयेत. तिचे आई-वडिल एकामागोमाग एक धक्क्याने निघून गेले. नातलगांनी हिला नाकारलं. मग मीच माझ्या बायकोशी बोललो आणि घरी घेवून आलो. गेल्या २ वर्षांपासून ती माझ्यासोबतच रहाते. पण तिच्यासाठी मी तिचा बाबा आहे, आणि माझी पत्नी तिची आई ! मी फोन बंद करण्यापर्यंत ती मलाच मेसेज पाठवायची आणि “बाबा, मला मारू नका” म्हणून माझ्याजवळच रडायची. सहन न होवून मी फोन बंद केला आणि तो नंबर तुम्हाला मिळाला. तुम्हाला आलेले आणि माझ्याजवळचे मेसेजिस चेक करा...सेम आहेत. ती त्याच आठवणींमधून कैद झालीये...! कालही तिनं नस कापून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही बाहेर होतो. यायला वेळ झाला. खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टर म्हणालेत....तसंच झालं तर बरं होईल....सुटेल माझी आशना !!!”-पुन्हा त्याचा बांध फुटला.

            काचेतून पुन्हा एकवार आत नजर टाकली. तिच्या निरागस चेहर्‍यावरून नजर हटत नव्हती. प्रेम केल्याची केवढी मोठी शिक्षा मिळाली होती तिला ! शत्रूलाही असं जीणं न येवो. तिच्या नावाचीही नियतीनं किती क्रूर चेष्टा केली होती ना ! “आशना” म्हणजे “प्रेमपात्र” आणि जी प्रेमपात्र होती तिलाच तिचे प्रेम मिळू नये, ही केवढी मोठी शोकांतिका !

            त्यानंतरही कित्येक दिवस तिचा फोन नंबर मी “अननोन” असाच सेव्ह करून ठेवला होता. या घटनेनंतर बरेच दिवसांनी पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला. छातीत धडकी भरली. घाबरत फोन उचलला.

“हॅलो...”-तो मैथिलचा आवाज होता.

“मैथिल ? अहो बोला ना, आज या नंबरवरून कसं काय फोन केलात ?”

“आशना गेली.”-पलिकडून रडका आवाज, “म्हंटलं...ज्या नंबरला आशना माझा नंबर म्हणून फोन करतीये, त्या नंबरला शेवटचा फोन करून सांगावं, हा नंबर बंद करतोय म्हणून !”-त्यानं रडतच फोन कट केला.

मनात एक विचित्र रुखरुख लागून राहिली. उगाचच मन जड वाटू लागलं. आशनाचा निरागस चेहरा आणि तिचं मैथिलवरचं असीम प्रेम माझ्या मनात बघता बघता आभाळाएवढं झालं. मैथिलबद्दलही खूप आदराची भावना दाटून आली. आपलंच कुणी खूपच जवळंच गेल्यासारखं वाटू लागलं. निराश होवून मी त्या अन-नोन सेव्हड नंबरवर नजर टाकली. आता पुन्हा कधी मला त्या नंबरवरून फोन येणार नव्हता की मेसेजही येणार नव्हता पण तरीही तो नंबर मी डिलीट करणार नव्हतो, कधीच ! कारण तो खूप जवळचा “अन-नोन सेव्हड नंबर” होता !!!

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index