तसा माझा तो
नेहमीचाच रस्ता होता...
त्या
रस्त्यावरच्या बाभळी, धोतर्याची गुलाबी फुले...
आणि मधूनच
घुमणार्या एखाद्या माकडाची हूल !
संध्याकाळी
मात्र कधीही,
एकाही
काजव्याला किंवा रातकिड्याला मी ओरडताना पाहिलं...
पाहिलं !?
छे...ऐकलं नाही !!
माझी आज्जी
जेंव्हा सांगायची तिच्या तरुणपणीच्या गोष्टी...
आणि बाबा
ऐकवायचे त्यांच्या परिश्रमाचे किस्से...
तेंव्हाही कधी
कुठल्या काजव्याचा किंवा रातकिड्याच्या आवाजाचा उल्लेख त्यांनी केलेला उल्लेखही
आठवत नाही !
जेंव्हा पांढर्या
कागदावरच्या काळ्या शाईची ओळख झाली तेंव्हाची गोष्ट...
सुरूवातीला
कडक पानाचा आवाज आणि मनात दरवळत रहाणारा कागदांचा वास...
यासाठीच ती
तोंड ओळख झाली होती !
नंतर आठवत
नाही एक्झॅक्ट कधी पण,
त्या शाईलाही
अर्थ असतो...आशय असतो, हे जेंव्हा कळू लागलं...
अगदी त्या
क्षणापासून नाही पण मनात दरवळणारा वास...
शाईआड
लपलेल्या समाजाच्या किसळवाण्या दुर्गंधीत कधी हरवून गेला ते कळलंच नाही !
शाईआड तसे
होते बरेच...
दैदीप्यमान्य
इतिहास, राष्ट्रवीर, राष्ट्रपुरूष, साधू-संत, नाटकं, गीतं, कथा, कविता आणि,
आणखीही बरंच
कांही !
वेचलेही बरेच,
पचवले...झेपेल तसे...! पण, त्या स्ट्रॉंग दुर्गंधीच्या वासात...
मग नंतर सारेच
वास...तसेच भासू लागले...! हां...एक मात्र झाले,
काजवा,
रातकिड्यांची भुरळ पाडणारी वर्णनं मात्र खोल रुतून राहिली...
आजही ती तशीच
रुतून बसलीयेत !
ती वर्णनं
वाचून मग मी वेड्यासारखा प्रश्न विचारत रहायचो...
आज्जी, आई,
बाबा, दादा, मित्र-मैत्रिणी आणि बहुतांशी स्वत:ला !
का बरं
इतरांना दिसणारी काजवं, रातकिडे मलाच दिसत नाहीत ?
का बरं
रातकिड्यांचा आवाज माझ्याच कानांना ऐकू येत नाही ?
हा घोळ
असतानाच मग आणखी एका गोंधळाची भर त्यात पडली...
चंद्रमौळी !
कित्येक
मनमोहक किस्से आणि वर्णनं दडली आहेत त्या काळ्या शाईआड...
वाचताना
वाटायचं, व्वा ! घर असावं तर चंदमौळी...
मग प्रश्न
पडायचा...
लहान असताना
आज्जी आम्हांला घेवून गावी जायची, मेच्या सुट्टीत आणि
वळीवच्या
रात्री पोटाशी धरून गलबलून जायची !
माकड्यांच्या उड्यांनी हैराण झालेली कौलं जेंव्हा कधी जीव सोडायचीत...
तेंव्हा ते घर
दिवसा सुर्यमौळी, रात्री चंद्रमौळी आणि पावसाळ्यात पाणमौळी बनून,
शेणानं
सारवलेल्या जमिनीला लिबलिबीत करून टाकायचं !
तेंव्हा वरून
पडणारा वळीव इतका भयानक वाटायचा नाही जितका,
वळीव
आज्जीच्या डोळ्यांमधून माझ्या अंगभर पसरायचा !
हेच का ते
कवी-कथाकारांनी वर्णिलेलं स्वर्गीय सुख !?
पण तेंव्हाही
कधी कानावर रातकिड्यांचा आवाज म्हणा किंवा
काजव्यांचा
जथ्था दिसला दिसला नाही बुवा !
आताशा वाटू
लागलं होतं,
या
काजव्याच्या आणि रातकिड्यांच्या शोधात,
माझ्याच मनात
चांद्रमौळी रितेपण उभं राहिलंय कि काय !
हाच रितेपणाचा
संसार सांभाळत, गोंजारत, सावरत...
माझा तो
नेहमीचा रस्ता पार करताना कित्येकदा...
रस्ताकडेलाच
असलेल्या स्मशानातून उठणार्या चितेची धग...
कधी अर्धवट
जळलेल्या प्रेताचा कालवून टाकणारा उग्र दर्प...
तर कधी
दंगलींसाठी राखून ठेवलेल्या टायरींचा एक ढिग...
प्रेतावर
टाकल्यानं बाहेर पडणारा काळा वास !
मला मान्य
करावंच लागेल...
इतर कोणत्याही
गोष्टींनी नाही पण चितेच्या ऊबेसाठी बर्याच वेळा,
मी वाट वाकडी
करून स्मशानाचा रस्ता धरला आहे !
तसाही मला
लोकांचा का कुणास ठाऊक पण तिटकाराच...
मला,
प्रेतांशी बोलायला आवडतं ! हितगुज...का काय म्हणतात ते माझं त्यांच्याशी खूप छान
होतं !
माहित नाही का
पण मनात खूप भीति बसलीये...लोकांची !
प्रेतं, तुमचं
वाईट चिंतत नाहीत...
समोर कौतुक
करून तुमच्या पाठीमागं तुमची उणी-दुणी काढून गॉसिपींग करत नाही !
किंवा तुमचं
सुख-प्रगती बघून ‘जळत’ तर कधीच नाहीत त्यामुळं,
‘जळण्यातून’
निर्माण झालेला तिरस्कार काय असतो, हेच मुळात त्यांना ठाऊक नसतं !
हिंदूंची “स्मशानभूमी”
असो... वा मुस्लिम लोकांचे “कब्रस्तान”
पारशांचे दखमा
(टॉवर ऑफ सायलेन्स) असो वा इसायांचे ग्रेव्हयार्ड !
सगळ्या ठिकाणी
फक्त प्रेतंच भेटली मला...
त्याव्यतिरिक्त
कोणताच ‘कलंक’ नव्हता मागे शिल्लक !
पूर्वी
ऐकायचो...म्हणे, कावळे, गिधाडं आणि घारी...खूप घिरट्य़ा घालयच्या !!
असंही ऐकलंय
१५ ऑगस्ट १९४७ रोजी म्हणे ‘आपण’ स्वतंत्र झालो...
‘आजादी’
मिळाली !!!
मध्यंतरी मला
कधीच कावळे-घारी-गिधाडं दिसली नव्हती...
त्यांना
रस्तावर-शेतात-माळात कुठेही पडलेली प्रेतं खायला मिळत नव्हतीत ना !
हल्लीच एक
कावळ्यांचा-घारींचा आणि गिधाडांचा एक थवा...
बाळसं धरून
आपल्या पंखांची ताकद आजमावताना पाहिला !!!
चितेची ऊब आता
बरीच कमी झाली होती...
प्रेत छान
जळालं होतं...
घरच्यांची
चिंता मिटेल त्याच्या कदाचित !
पुन्हा मी
माझ्या नेहमीच्या रस्त्यावर...
आणि कधी नव्हे
तो समोर काजवे...
कानावर
रातकिड्यांचा आवाज...!
आजवर कधीही न
ऐकलेला...
प्रेतांचा
हर्षोल्हासाचा चित्कार !!
आता ना रस्ता
होता...
ना पायवाट...
ना धोतर्याची
गुलाबी फुले...
ना बाभळी !!!
- - अनुप
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.