Pen


PEN 43 : लघुकथा १५ : मौजा

मौजा रंगात आली का सांगायची,

“बये, माजी तर छाती दडपूनच गेल्ती बग ! ह्ये बड्या बड्या इमारती...ह्ये रस्ताभर गाड्या...संद्याकाळी माजावर आल्या का उधाणून रस्त्यावर येवून उघड्या पडणार्‍या समिंदराच्या लाटा ! तुला सांगत्ये शाण्ये... मुंबैची मज्जाच लई निराळी हाय !”

असं काय-बाय बोलून झालं का मग, का कुणास ठाव मान अन नदर दोनी बी वळवून घ्याची. का ? ते मातूर कवाच कळलं नाई मला !

मौजा माज्यापरीस धा वर्सानं मोटी. तिची आय सुईण हुती. गावातल्या समद्या बायांना तिच्याच आयनं मोकळं किलं हुतं. माजा जनम बी तिच्या हातनंच झाल्ता. मौजा बी हुती संगट तवा. आयला मदतीला जायची. तिला मदत करू लागायची. मौजाचा लई जीव हुता माज्यावर. ती पयल्यांदा आयबरूबर जायला अन माजा जनूम व्हायला एकच गाठ...म्हणून असल कदाचित ! ल्हान असताना म्हणं, मौजा परक्या कुणाला हात लावू द्यायची न्हाई. कवा म्हणून खाली ठिवलं न्हाई तिनं मला. मौजाच्या अंगा-खांद्यावरच मोटी हुत हुते मी !

आमच्या गल्लीत दारकाई हुती. दुपारचं आमच्या घरात यून बसायची. एकलीच हुती. पेन्शिल याची, त्यावरच तिचं पोट-पानी हुतं. तसा म्हातारीचा काय बी खर्चा न्हवता. पोरगा मुंबैला नोकरीला गेला ते कवा परत आलाच न्हाई. म्हातारू मातूर तीस वर्सं हुयाला आली तरीबी गल्लीत मोटार वाजली का हातातलं काम टाकून, पदराला हात पुसत, एका हातात भाकरीचा तुकडा घिऊन भाईर याची अन आपला पोरगा न्हाई ते बगून, समोर कट्ट्यावर बसलेल्या आपल्या मैतरणीला हाक मारून म्हणायची,

“काय सुम्ये...क्वारभर खाल्लीस काय ?”

अन तिला ईचारत आपल्या हातातली क्वारभर भाकर तोंडात टाकून, नदरंतलं खारट पानी सोबतीला पिवून आपलं दुक गिळून टाकायची ! दुपारची चार भांडी घासून टाकली का दारकाई रातीपतूर रिकामी असायची. दुपारी नेमानं घरात यून बसायची. ती एकदा सांगाल्ती, असंच कवातर म्हनं, कोन गावचा पावना दुपारचं घरला आल्ता. मौजा मला भाईर खेळवत बसल्याली. पावना चालला. जाताना मला कडंवर घित व्हता तवा फुडं हून मौजानं त्येच्या टक्युर्‍यात काठी हाणल्याली. लई दंगा झालता म्हनं. पोलिस गाड्या सारक्या याच्या अन माज्या आईला, मौजा अन तिच्या आईला बी लाता-बुक्या हाणायच्या.

            मी ल्हान असताना काय बी कळत न्हवतं...तसं अजून बी काय समजत न्हाई मला ! पर मोटी व्हताना, एक गोश्ट कळाय लागल्याली...आमच्या वस्तीवर कोन बी पुरूस र्‍हात न्हवता...समद्या पोटुशी बायका, म्हातार्‍या अन ल्हान मुली ! पोरगं जनमलं का त्येला मुंबैला पाटवायचीत. लई दिसानं मला समजलं का, मुंबैपास्न जवळच्या पाड्यात आमी र्‍हात हुतो. मुंबै हाकंच्या आंतरावर हुती अन तरी आमच्या पाड्यावर लाईट न्हवती का रस्ता ! लई अजब वाटायचं समद्याचं पर कोनच उत्तर देत न्हवतं. समदी सांगायचीत, लई ईचार नको करू, पोरगीची जात आपली...येळ आली का समजल समदं ! मी बी रोज ईचारायचे, आली येळ ? आली येळ ? मला ईचारताना बगून मौजा मला छातीला धरायची अन म्हणायची,

“लेकरा, न्हाई आली येळ अजून अन येवू बी नये कवा ! ल्हान हाईस...ल्हानच र्‍हा !! पोरीच्या जातीनं कवाच मोटं हु नये बा ! न्हाईतर भाईर लई जनावरं मोकळी फिरत्यात, ती फकस्त पोरींचीच शिकार करत्यात !”

“मौजा, ती जनावरं आपल्या वस्तीवर न्हाई ना येणार ?”

“रातीच्या अंदारात कवा कवा येत्यात ती जनावरं वस्तीवर ! शिकार करत्यात अन निगून जात्यात. नकुशी, तुला ठावं हाय, मुंबैत कोंबड्या, शेरडं पाळत्यात..त्येनला मोटं करत्यात अन येळ आली का लोकांची खाज भागवायला कसायाला ईकून टाकत्यात !” कशीतर हसून कपाळाचा मुका घेत पुटपुटायची,

 “जिंदगी रांड हाय बग ! पाय पसर म्हणलं का पसरायचं अन चढवून घ्याचं, आपल्या हातात काय बी नस्तं बग !!”

का ठावं न्हाई पर तवा बी मान फिरवून नदरतलं पानी पुसून घ्याची. काय समजायचंच न्हाई तवा...अजून बी न्हाई !

            माज्या आईचं अन माजं कवा पटलंच न्हाई. कदी तिनं जवळ घिऊन बोलली, दोन घास भरीवली असं कवाच जालं न्हाई ! दारकाई सांगायची, अन म्हणूनच माजं नाव तिनं नकुशी ठिवलं. सात भैनींवर मी जनमलेली...आटवी पोरगी ! कोनतर सांगितलं...व्हनार्‍या पोरीचं नाव नकुशी ठिवं फुडचं पोरगंच जनमल. आयनं माजं नाव नकुशी ठिवलं. नकुशी...नको असनारी ! जवा समजलं तवापास्नं माजी बी नाळ मरून गेली. आमी दोगींनी बी बोलनं टाकलं. तिची जागा दारकाई अन मौजानं भरून काडली हुती. एकदा राती मौजाच्या कुशीत परड्यात निजले हुते. हलक्या हातानं मौजा थापटत हुती. वरच्या काळ्या-निळ्या आकासात बग्ताना एकाएकी मौजाला ईचारलं,

“मौजा, माज्या भैनी कुटं असत्यात ?”

“त्येंची मुंबै बगायची येळ जाली...त्या गेल्या निगून !”

“अन तुजी ?” मी तिच्या नदरला नदर लाऊन ईचारलं.

मौजा बोलली नाई. तिनं नदर बंद करून घितली. मी हिरमसून तिच्या छातीवर डोकं टेकलं तवा तिच्या छातीची धडधड लई जोरात हुत हुती...जणू, आत्ता काळीज भाईर पडतंय का काय !

            जाग आली तवा हांतरुणात मी एकलीच हुते. समदं सुमसाम हुतं. उटून मौजाला हाका मारल्या. घरात कुणीबी न्हवतं. हुंबर्‍यात दारकाईनं भोकाड पसरल्यालं. कपाळ काय बडवून घित हुती, छाती काय बडवून घित हुती ! गल्लीतल्या बायका घोळका करून कुजबूजत हुत्या. कायच कळत न्हवतं. मला बगून दारकाईनं हात पसरून जवळ बोलिवलं.

“तुजी मौजा मुंबैला गेली...तिची येळ जाली !”

मला थरथरत्या मिटीत घिऊन दारकाई लई रडली. येड्यासारकी माज्या डोक्यावरनं हात फिरवत हुती, गालावरनं हात फिरवत म्हणत हुती,

“तुला नाई सोडायची मी ! तू हितंच माज्याजवळ र्‍हायचं...तुला नाई सोडायची मी मुंबैला !”

“का ? मला बी जायचंय मुंबैला...माजी कवा येळ येणार ?”

दारकाई परत छातीला कवटाळून लई येळ रडत हुती.

            दिसातनं धा-धा येळा मौजाच्या घरात जाऊन बगत हुते. मौजा काय येत न्हवती. माजी आई...मैतरीण...भैन समदं हुती मौजा ! ती निगून गेली अन माजं ल्हानपनच हरवून गेलं. एकलीच बसून र्‍हायचे. डोळं उगडून बगाय लागले. रातीच्या अंदारात तोंडं लपवत येणारी पुरूस मानसं बगत हुते. रातभर खोपट्या-खोपट्यामधनं येणारं ओरडा-ओरडी, भांडणांचं आनी सुस्कार्‍यांच्या आवाजाची वळख व्हायला लाग्ली. मौजा सांगायची ती जनावरं आता मलाबी दिसाय लागली हुती ! कवा कवा कोड्यात मौजा बोलायची, त्ये आता उमगाय लागलं हुतं. आमच्या वस्तीवर पुरूस र्‍हात नव्हतं ह्येचं कारण बी समजलं. आमची रांडांची वस्ती हुती. मुंबैची खाज भागवायला आमची पैदास केली जायची. हितं ठरून गेल्यालं हुतं, पोरगं झालं तर भीक मागायला न्हाईतर दोन नंबरची काम करायला पाटवून द्यायचीत मुंबैला अन पोरगी जाली तर वयात यूस्तवर वस्ती अन नंतर वय हुईपर्यंत मुंबै अन परत दारकाईसारकं उतार वयात मरण येऊस्तवर पडून र्‍हायचं वस्तीवर. आमच्या वस्तीवर खरं कोनपनं वय व्हवून मेल्यालं आटवत न्हाई, असं दारकाई सांगायची. समद्या बायका रोग व्हवून मरून जायच्या. त्येन्ला जाळायला बी कोन पुरूस येत नव्हता वस्तीवर !

           अंदारी अन घुसमटणारी घरं, जीव सोडनार्‍या भिंती, हुंबर्‍याला लागूनच व्हानार्‍या गटारी, त्याच पाण्यात पळनारी उगडी-नागडी पोरं, समद्या वस्तीवर भरून र्‍हायल्याला कुबट वास अन त्यो वास यू नये म्हनून गुटका न्हाईतर पाच रुप्याची देशी पिनार्‍या बायका ! रेडूओवर परवाच कोनतर सांगत हुतं...आपला देस सोतंत्र हुन लई वर्सं जाली अन आता आकाशात बी पानी हुडकाय चाल्लोय म्हणं ! मौजा अस्तीतर हसली अस्ती अन म्हण्ली अस्ती,

“मुंबैनं सोडल्याल्या मुतावर अन सांडपान्यावर आमच्या हितं एक दिस यून प्यून दावा ! आमी आयुक्ष काडतूय त्येच्यावर !”

            पाच वर्सं होत आल्तीत मौजाला जावून अन तवा जसं तिच्या छातीत धडधडायचं तसं आता माज्या बी व्हवू लागलं हुतं. माजी येळ जवळ येत चालल्याली, मला बी समजाय लागली हुती. मला समजायच्या आदी, वस्तीवर येनार्‍या जनावरांच्या नदरत पयल्यांदा मला समजलं ! त्येंच्या छातीवरच्या अन अंगभर पसरनार्‍या लाळ गाळनार्‍या नदरा बगून अंगावर कपडे असून बी नसल्यावानी वाटायचं ! वाटायचं, पळून तर जाव, न्हाईतर जीव द्यून रिकामं तर व्हाव ! एकदा ठरिवलं. एका पिशवीत दोन-चार कपडे भरलं अन रातोरात पळून जायचं म्हनून घराभाईर पडलो. पर एका मोटारीचा आवाज आला अन आडोशाला थांबलो. मोटार मौजाच्या घराजवळ थांबली. एका चादरीत गुंडाळून कुणाला तर आनलं हुतं. दारावर एकानं फुडं हून थाप मारली. दार आयनं उगडलं. लोकं कायतर बोल्ली. तिनं तोंडावर हात ठिवला अन रडाय लागली. रातीच्या अंदारात ती आलीत तशी निगून बी गेलीत.

            दाराच्या फटीतनं वाकून बगीतलं तर रगतानं भरल्याली मौजा निपचीप पडली हुती. आय वल्ल्या कापडानं तिच्या मांड्यांवरचं रगात रडत रडत पुसून काडत हुती. सकाळ हुईस्तवर मी तितंच भिंतीला टेकून बसलो हुतो. सकाळ जाली. घराचं दार उगडलं तसं आत शिरलो अन मौजाजवळ जाऊन फत्कल मारली. ती अजून बी निजली हुती. तिच्या चेर्‍याकडं बगून पोटात कालवाकालव जाली. जाताना माजी मौजा अन आत्ता हतरुनात निपचीत पडल्याली मौजा ! आत्ता कुटं वीशी पार केल्ती मौजानं पर चाळीशीतल्या बाईसारकी व्हवून गेल्ती. सावळी पर तकतकीत हुती माजी मौजा अन आता पार रया निगून गेल्ती तिची !  लई येळानं मौजाला जाग आली. गरम गरम लापशी करून दिली तिला तवा कुटं हुश्शार जाली. पर एक शबूद बोलली नाई मौजा ! समूर आलो का नदर चुकवायची. निसतीच नदरतनं पानी गाळायची. दोगींना बी बोलायचं हुतं पर सूरवात कोन करनार ? काय म्हनून करनार ? दोगींला बी समजत हुतं ! दुपारी मऊ भात अन कालवन जेवायला द्यून मी पिशवी उचलून निगालो तवा मौजानं सोताहून हाक मारली.

“काल लई मोट्या सायबाकडं गेल्ते...लई लोकं हुती. वाढदिवस हुता त्येंचा ! समद्यांना खूस करन्याच्या मोबदल्यात बक्कळ पैशे मिळाल्यात !”

मला कायच कळंना. मी तिच्याकडं बगितलं.

“पळून चाललीयास तर पैशे नगोत ? घिऊन जा...मोकळी हो ह्यातनं ! मला जमलं न्हाई पर तू नको जगू ह्या घाणीत. काय बी काम कर पर ह्ये नगो...! शिसारी येतीया जगायची...शिसारी !! माजी काळजी करू नगो...आता माजी नाई सुटका ! पर त्या जनावरांला तुजी चटक लागायची आदी पळून जा...”

कितीतरी येळ तिच्या गळ्यात पडून रडलो हुतो.

            चार वर्सं जाली आत्ताशी ह्येला ! पर समूर मौजाला घास भरवताना बगून पुना समद्या आटवणी जाग्या जाल्या ! घास गिळताना दवाखान्याच्या दाराकडं नदर गेली. आज बी परत पोलीस आलं हुतं.

“ह्ये बघ, उगाच बलात्काराची केस घालायच्या फंदात पडू नको. ती बड्या बापाची औलाद आहे...तो सुटून जाईल ! पण कोर्टात तुला जेंव्हा उभं केलं जाईल तेंव्हा विचारतील...तुझ्या आई-बापाबद्दल. तेंव्हा काय सांगशील ? मी वेश्येची मुलगी आहे म्हणून ? हे बघ, तो पैसे देतोय ते घे आणि शांत बस. नाहीतर पैसेही जातील आणि चुकून तुझ्यावर एसिड हल्ला-बिल्ला झाला तर तू दुसरा काय पण धंदाही करून पोट भरू शकणार नाहीस ! काय ? कळतंय का ??”

             मौजा मग माझं मन हलकं करायला काय-बाय सांगायची. रंगात यायची. मौजा रंगात आली का सांगायची,

“बये, माजी तर छाती दडपूनच गेल्ती बग ! ह्ये बड्या बड्या इमारती...ह्ये रस्ताभर गाड्या...संद्याकाळी माजावर आल्या का उधाणून रस्त्यावर येवून उघड्या पडणार्‍या समिंदराच्या लाटा ! तुला सांगत्ये शाण्ये... मुंबैची मज्जाच लई निराळी हाय !”

असं काय-बाय बोलून झालं का मग, का कुणास ठाव मान अन नदर दोनी बी वळवून घ्याची. का ? ते मातूर कवाच कळलं नाई मला !

 

-अनुप

 

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her.

 

Pen Image

Pen Index