प्रिय मित्र,
मंदार यांस...
स.न.वि.वि.
पत्रास कारण की, बरेच वर्षात आपले
कांहीच बोलणे झाले नाही. आज “मैत्र-दिन” (प्रेंडशिप डे) आहे म्हणे ! इतरवेळी तुझी
आठवण येवो ना येवो पण दरवर्षी मैत्र-दिनादिवशी हमखास तुझी आठवण येते. जर
यदा-कदाचित माझे “पेन” सदर फॉलो करत असशील तर, त्यानिमीत्ताने का असेना, तुझ्याशी
बोलता येईल, म्हणून हा अट्टाहास. फोटो पाहीलास ? २००९ च्या फ्रेंडशिप डे ला तू, मी,
सागर आणि रणजीत ट्रेकिंगला गेलो होतो, पाटगांवच्या जंगलात, तेंव्हा काढलेला.
कदाचित, तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो असावा हा !
मित्रा, आपली मैत्री म्हणावी तर जुनी
आणि म्हणावी तर अगदीच अलिकडची होती. आपण दोघेही ११-१२ वीला एकत्र होतो पण
ओळखीपलिकडे आपण जास्त कधी जवळ आलोच नाही. १२ वी सायन्स चा रिझल्ट लागला तेंव्हा
आठवतंय, अचानक तू समोर येवून म्हणाला होतास, “अभिनंदन अनप्या ! आता तू तुला हवं
असेल ते करू शकतोस !” तेंव्हा खरंच मला आश्चर्य वाटलं, मी फेल झालेलं अजून
माझ्याशिवाय आणि त्या क्लार्कशिवाय कुणालाच माहित नसताना तुला कळलंच कसं ? पुन्हा
१२ वी कला शाखेतून प्रवेश घेवून क्रमांक मिळवला तेंव्हा तुझा घरच्या नंबरवर फोन
आला होता, पुन्हा अभिनंदनासाठी ! तुझ्या भोवती ना मंद्या, खूप गूढ वलंय होतं,
अजूनही आहेच म्हणा !
१२ ऑगस्ट २००६, माझ्या पहिल्या
लघुपटाचा प्रिमिअर शो होता, राजश्री थिएटरमध्ये. शो संपल्यावर तू येवून मारलेली
मिठी मी आजही विसरू शकत नाही मंद्या ! त्या क्षणापासून तू माझ्या आयुष्याचा
अविभाज्य भाग बनून गेलास. एम.ए. ला असताना तू तुझ्या वडिलांना पिक अप करायला
कॉलेजवर यायचास आणि मी बागेत वाचत बसलेला असायचो. काका येवूपर्यंत आपण तास-तासभर
गप्पा मारत बसायचो. गप्पा अगदी रंगात यायच्या कारण आपल्याला जोडणारा एक समान धागा
होता, तो म्हणजे, “सिनेमा”. तुलाही चित्रपट बघायला आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला
आवडायचं आणि मलाही ! तेंव्हा एकदा गंमतीने तू म्हणाला होतास,
“अनप्या तू
एकतर लवकर लग्न करणार नाहीस किंवा करणारच नाहीस !”
“का रे बाबा ?”
“कारण जर
सिनेमा आणि लग्न किंवा प्रेम यापैकी एक गोष्ट चूज कर, असं जर कुणी विचारलं तर शंभर
टक्के तू सिनेमाच निवडशील, याबद्दल खात्री आहे मला ! तुला सिनेमासकट निवडणारी
मुलगी लवकर मिळेल असं वाटत नाही मला !”
दोघंही खूप
हसलो होतो. पण, मित्रा तू भविष्य पाहिलं होतंस की काय !? अशी चुणचूण आजही मनाला
लागून रहाते.
या दरम्यानच्या माझ्या अनेक घटनांचा
तू एकमेव साक्षीदार होतास. कित्येकदा रात्री-अपरात्री तुला भेटून गळ्यात पडून
रडल्याचं स्पष्ट आठवतंय मला. एम.ए. नंतर मी पुण्याला एका फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये
प्रवेश घेण्यासाठी परिक्षा दिली होती आणि निव्वळ एका मार्कात माझा प्रवेश हुकला
होता. तो दिवस माझ्यासाठी खूप भयानक होता. सकाळी रागाने घरातून बाहेर पडलो आणि
तलाववर जावून रागाच्या भरात हिचकॉकची एक कथा वाचून काढली. दुपारी तुझा कॉल आला,
“अनप्या, इडली
मागवलीये दुकानात. येणारेस ?”
तुला माझा विक
पॉईन्ट माहित होता. पण, बाबांनी फोन केल्याचं मात्र तू सांगितलं नाहीस.
“चल अनप्या,
तुझा हॅण्डिकॅम घेवून आपण बाहेर जावूयात ! कांहीतरी शूट करून येवूयात बरं वाटेल
तुला !”
भर सिझनमध्ये
दुकान बंद करून तू आणि सागर माझ्यासोबत रामलिंगला आलात आणि वाचलेल्या हिचकॉकच्या
गोष्टीवर आपण शूटिंग केलं. ना स्क्रिप्ट होती ना संवाद. ज्याला जे वाटेल ते बोलत
गेलो आणि रात्री उशीरापर्यंत शूटिंग केलं. खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी ! सहज
मजा म्हणून केलेलं शूटिंग इतकं छान होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक-दोन
दिवसांनी आपण फुटेज बघत होतो. फुटेज पाहून बाकिचेही उत्साहित झाले. आणि एडिटिंग
करून फिल्म रिलीज करण्याचा विचार पुढे आला. पैसे नव्हते. करायचं काय ? पैसे
जमवायला वेळ लागणार होता. तू बॅंकेत जावून तुझ्या खात्यावरचे पैसे आणून समोर
ठेवलेस, पण नाव मात्र येवू दिलं नाहीस. रात्री-अपरात्री एडिटिंगला जाणं, पहिल्यांदा
लिगली ओरिजिनल म्युझिक राईट्स घेणं, पैसे वाचवण्यासाठी दिवस-दिवस उपाशी राहून
रात्री कोल्हापूरच्या बस-स्टॅण्डवर भुर्जी-पाव खाणं ! महिन्याभराच्या धडपडीनंतर “कॉन्ट्रॅक्ट”
फिल्म तयार झाली आणि गीतांजलीमध्ये प्रिमिअर शो पार पडला. माझ्या करिअरला खर्या
अर्थानं जर कुठल्या लघुपटानं आकार दिला असेल तर ती ही फिल्म होती आणि मित्रा,
यासार्यात तुझा खूप मोठा वाटा होता, आहे.
तुझं मेडिकलचं दुकान माझं हक्काचं
ठिकाण होतं. पुस्तक वाचायचं असेल, स्क्रिप्ट लिहायची असेल किंवा “पर्सनल कॉल” वर
बोलायचं असेल तर, तुझ्या दुकानातला कोपरा ठरलेला असायचा. इथंच बसून “ईपिफनी ऑफ
गॅलिलिओ”, “सदर्न काशी : दि सिटी ऑफ रेस्लिंग”, “योगा : दि नीड ऑफ टाईम”, “दि
डायरी” या लघुपट आणि माहितीपटांचं लिखाण केलं होतं. २००८ ला, ईपिफनी च्या शोनंतर
मी जेमिनी स्टुडिओला प्रवेश घेण्याचं नक्की केलं आणि २६/११ च्या रात्री बसमध्ये
बसलो. गाडी कर्हाडमध्येच थांबवून टाकली. कुणीच कांही सांगेना. रात्री ११ वाजता
तुझा कॉल आला आणि मुंबईवर हल्ला झाल्याची बातमी आली. मी मुम्बईला पोहोचेपर्यंत
रात्रभर तुझे कॉल सुरू होते. पुढच्या ३ दिवसांची दहशत मी अनुभवत होतो. प्रवेश
घेवून मी परतलो तेंव्हा तू स्टॅण्डवर घ्यायला आला होतास, तुझा काळजीचा चेहरा आणि
मिठी, आजही तितकीच माझ्या मनात ताजी आहे !
एडमिशननंतर मात्र महिन्यातून एकदा
आपली भेट व्हायची. पण स्टॅण्डवर सोडायला यायचा तुझा नियम तू मोडला नाहीस. जुलै
२००९ मध्ये लेखी परिक्षा देवून मी १० दिवसांच्या सुट्टीवर आलो होतो. फ्रेंडशीप डे
दिवशी ट्रेकिंगला जायची तू कल्पना सुचवलीस आणि आपण चौघे पाटगांवला निघालो.
तुझ्यासोबत मी पहिल्यांदा मी पाटगांव पाहिलं आणि मित्रा शपथेवर सांगतो, आजही
महिन्या-दोन महिन्यातून एकदा तरी पाटगांवला गेल्याशिवाय मला चैन पडत नाही.
त्यावेळेला पहिल्यांदा आपण “शिकार”, आपली पहिली शॉर्ट फिल्म नव्याने या जंगलात शूट
करण्याचा संकल्प केला आणि १० वर्षं झाली तरी आजही मी त्याच प्रयत्नात आहे मंद्या !
कदाचित तू सोबत असतास तर हे स्चप्न आपण केंव्हाच पूर्ण केले असते. हा ट्रेक मी
आयुष्यात विसरू शकणार नाही. आजही तुला मिस करतो तेंव्हा ते सारं फुटेज पुन्हा
पुन्हा पाहून काढतो. मी सेलिब्रेट केलेला तो शेवटचा फ्रेंडशीप डे !
माझी सुट्टी संपली. मुंबईला
जाण्यागोदर तू घरी येवून आईला म्हणाला होतास, “काकू. तुमच्या हातचं मटन खावून खूप
दिवस झाले. अनप्या पण जाणार उद्या. करा ना आज रात्री जेवायला मटन !”
मटन-चिकन
खाण्याचं, माझं घर हे तुझं हक्काचं ठिकाण. घरी खाण्यावर बंदी आणि बाहेर कुणी बघेल
म्हणून घरी येवून आडवा हात मारायचास ! त्या दिवशीही सागर, तू, मी, रणजीत मनसोक्त
जेवलो आणि “गुलाल” सिनेमा पाहिला. ते दोघे झोपले तरी तू ती फिल्म बघून एवढा
एक्साईट झाला होतास की, स्वत:ही झोपला नाहीस आणि मलाही झोपू दिलं नाहीस.
“यार, अशा
फिल्म्स बनायला हव्यात ! अनप्या, तू डिरेक्टर आणि प्रोड्यूसर !! मित्रा, मी
तुझ्यावर पैशे लावतो. तुला बनवायची तशी फिल्म बनव, मी आहे सोबत ! तू कोर्स पूर्ण
करून ये, तोवर मी पैशे मिळवून ठेवतो !”
दुसरे दिवशी आपली भेटच झाली नाही. पण
फोनवर म्हणालास, “तुझं आवरलं की सांग मी तुला कोल्हापूरला सोडायला येतो.” दिवसभर
कामं आवरून, बॅग भरून ६ ला तुला कॉल केला.
“अनप्या, अरे
चिक्कोडीला एका पार्टीकडं जायचंय आणि रात्री एका मित्राचा बर्थ डे आहे, तो जेवण
देणारेय. सॉरी यार, ह्यावेळी तेवढं येवू शकत नाही.”
मीही रागानं
फोन कट केला. त्यानंतर ना मी तुला फोन केला ना तुझा फोन आला. दुसरे दिवशी सकाळी १०
वाजता, “थ्री शॉट कॅरॅक्टर स्टेजिंग” चे प्रॅक्टिकल सुरू होते. रणजीतचा कॉल आला.
कट केला. फोन न घेण्याचा नियमच होता तसा. पुन्हा कॉल आला. पुन्हा कट केला. ५-६
वेळा तसंच झालं. रमेश सर वैतागून म्हणाले,
“भेंचोद !
क्या कर रहा है ? ध्यान किधर है ? देखो जाओ...तब तक तुम्हारा ध्यान नही लगेगा !”
वैतागून बाहेर
येवून कॉल उचलला. रागानेच म्हणालो,
“काय रणज्या ?
काय झालंय ?”
माझा आवाज
ऐकून रणजीत रडू लागला.
“रणज्या...रणजीत...काय
झालंय ? सांगशील का ? रडायचं थांब पहिल्यांदा ! बोल...”
“अनप्या...अनप्या...मंद्या
गेला रे ! काल रात्री त्याचा अपघात झाला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला
आणि...आणि...ऑन दि स्पॉट गेला !”
माझ्या
पायाखालची जमिनच सरकली मित्रा ! माझा तोल गेला. बाजूला उभ्या स्पॉट दादानं पकडलं.
हातातला फोन गळून पडला आणि पुढचा तासभर कॉलेजच्या पायरीवर बसून वेड्यासारखा रडत
होतो
मी ! हज्जरदा
सांगितलं असेल तुला, गाडीला अक्कल नसते, जपून चालवत जा गाडी ! कांही फरक पडत नाही
१-२ मिनीटं उशीरा पोहचलं तर ! पण तू कधीच ऐकलं नाहीस. स्वत:चंच खरं करत आलास नेहमी
!
तडकाफडकी आमच्या सर्वांच्या
आयुष्यातून निघून गेलास. ऑगस्ट २००६ ते ऑगस्ट २००९ ! किती कमी वेळात,
माझ्या...आमच्या सार्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेला होतास ! तो फ्रेंडशीप डे
आणि एक दोन दिवसातली ती घटना ! आजही जेंव्हा फ्रेंडशीप डे येतो तेंव्हा मनात कळ
उठते आणि पुढचे आठ दिवस मला जगणं अशक्य होवून जातं ! म्हणतात ना, कांही लोकं
स्वत:साठी नाही तर, दुसर्यांसाठी जन्माला येतात...! तू तसा होतास मित्रा...!! तू
जे दिलंयेस..त्याची परतफेड नाही पण आजन्म तुझ्या ऋणात रहाणंच आवडेल मला !
विश यू हॅपी
फ्रेंडशीप डे मंदार...
लव्ह यू एण्ड
मिस यू फॉरएव्हर !!
-तुझाच
अनप्या