Pen


PEN 45 :कांही ओळी मनातल्या : ८ : दर्पण

दर्पणात आता चेहरा दिसत नाही !

मीच तो पूर्वीचा ? ओळख पटत नाही !!

धूसरलाय की फसवतोय ? कांहीच कळत नाही !

दर्पण तो पूर्वीचा, नक्कीच दिसत नाही !!

माझ्या बदलण्याला, त्याला दोष देणं नाही !

माझेच डोळे पाणावलेत, पण ‘तिच्या’वरती रोष नाही !

 

कॉलेजमध्ये शिकत असताना लिहीली गेलेली एक कविता. का ? कशासाठी ? कुणासाठी ? हे आपणासारख्या सूद्न्य वाचकांना सांगण्याची गरज नसावी ! कॉलेज जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमकवी बनलेलाच असतो. पण प्रत्येकजण माझ्याइतका निर्लज्ज नसतो की, चला पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकूयात ! पण कसंय ना, आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय ! आता या कविता ठेवून टाकण्यातही अर्थ नाही आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवर टाकल्यानं कुणाला **** चाही फरक पडणार नाहीये ! इतर वेळचं ठाऊक नाही पण आज नेमक्या याच कवितेची आठवण का व्हावी ? याचं एक कारण आहे.

“डोळे” हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. निव्वळ पहाण्यासाठीच नव्हे तर व्यक्त होण्यासाठीसुध्दा ! कित्येकदा आपल्यापैकी बरेचजण निव्वळ डोळ्यांनी व्यक्त होतात, होवू पहातात, होण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याचजणांची किंबहुना बर्‍याचजणींची अशी अपेक्षा असते की माझ्या मित्राने, नवर्‍याने न बोलता माझ्या नजरेतून जाणून घ्यावं ! अशा “माफक” अपेक्षा करण्यास हरकत नसावी पण त्यासाठी मुळातच तुमचे डोळे बोलके हवेत ! खरं सांगू का ? मला लोकांचे डोळे वाचायला आवडतात आणि कित्येकदा समोरच्याच्या मनातील गोष्टींचा अचूक वेध घेतल्याचं, माझे “जीवश्च: कंठश्च:” मित्रच सांगतात, म्हणून मीही आपला वेळ मारून नेतोय ! जोक्स अपार्ट...

कित्येकांना मी आजवर भेटलोय. कित्येकांच्या नजरा वाचल्यात किंवा निदान तसा प्रयत्न केला आहे पण गेल्या दोन दिवसांपासून दोन डोळे मी अजिबात विसरू शकत नाहीये ! अक्षरश: गेल्या दोन दिवसांपासून मी नीटसा झोपूही शकलेलो नाहीये. दोन दिवसांपूर्वी मी दोन डोळे पाहीले. काय नाव ? पत्ता-बित्ता ? कोन ? कुठला किंवा कुठली ? अं...??? कुठली ? हे ठिकये ! या सार्‍या तपशीलात जाण्याची गरज नाही. पण, मी जे डोळे पाहीले त्या डोळ्यांना पाहून मला माझ्याच वरील कवितेची आठवण झाली !

आपले डोळे हा आपला दर्पण (आरसा) असतो. तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकता पण स्वत:ला नाही...! स्वत:मधल्या त्याला नाही. पण, हाच मुखवता घेवून मी जगत असेन आणि जगा ऐवजी स्वत:लाच फसवत असेन तर ? हाशील काय ? नुकसान कुणाचं ?

मी पाहीलेले डोळे नक्कीच एका मुलीचे होते, मान्य ! बोलके होते, मान्य ! पण अस्वस्थ होण्याएवढं काय होतं ? कारण त्या डोळ्यांमध्ये ती भीति होती जी-

कसायासमोर उभ्या कोकराच्या डोळ्यात असावी...

जी पिंजर्‍यात डांबून ठेवलेल्या पक्षांच्या डोळ्यांत दिसावी...!

ती...

काय नाव देवूया बरं ? अं...??

अनामिका !? छे...खूपदा वापरलंय ते, मीच ! नकोच अनामिका.

  

नयना ? हं !! ठिक आहे. डन !

तर, नयनाने कांही मोजक्या क्षणांत, कांही सेकंदांमध्ये अतिशय माफक पण सूचक शब्दात तिचं पूर्ण आयुष्य माझ्यासमोर उभं केलं आणि लेखक म्हणवून घेणार्‍या मला स्वत:चीच प्रचंड लाज वाटली. निव्वळ ५ ते ६ ओळींत तिनं स्वत:ला चितारलं आणि बरंचसं डोळ्यांतून व्यक्त होत होती. ती जे डोळ्यांमधून व्यक्त होत होती, असं जे मला वाटलं, ते तिच्या एकटीचं दु:ख नाही तर ते प्रातिनिधिक बोलणं होतं आणि ते तिच्याच शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न करत आहे.

सूचक कथा म्हणा, कविता म्हणा किंवा कांहीही...जे असेल ते...,

नयना तुझ्यासाठी...

 

डोळे उघडले तेंव्हा लक्षात आलं...

निर्मात्यानं माझी निर्मीती केली तेंव्हा,

खूप मोठी चूक करून बसला होता...

मला मुलगी बनवून साल्यानं,

माझ्यावरती सूड उगवला होता !

स्त्रित्वात खोट आहे, असं मुळीच माझं म्हणणं नाही...

पण फारसा हाशील त्यातही आहे, असं म्हणण्यातही अर्थ नाही !

 

स्त्री म्हणजे स्तन आणि दोन पायांमधली जागा, इतकाच का त्याचा अर्थ होतो ?

आई होण्यातच का सार्‍या जबाबदार्‍यांचा अंत होतो ?

छाताडाच्या पिंजर्‍यात कोंडून टाकलेल्या मनाचा वाली आहे का कुणी ?

अंतहीन यातनांच्या टाहोचा सूर, पेटीमधून नादवणारा अवलिया आहे का कुणी ?

 

प्रेमापेक्षा, कार्टी उगाच रंग उधळेल म्हणूनच सारे डोळ्यात तेल ओतून जागोजागी पहारा देताहेत,

आणि वर जबाबदारी-प्रेमाचं लेबल लावून,

त्यांच्याच पुळचट अपेक्षा आणि “खानदानी” स्वप्नांचा ससेमिरा दावून...

माझ्याच अंकुरणार्‍या स्वप्नांचा आणि बाळसं धरू पाहणार्‍या पंखांचा बळी मागताहेत,

माझेच, माझ्या अवती-भोवती असणारे...

ज्यांना मी त्यांची आणि फक्त त्यांचीच असावी वाटते आणि माझ्या वाटण्याला फाट्यावर मारून,

तुला कुणाची गरज ? आहेस की तू खंबीर म्हणून,

माझ्याच जगण्याचा कणा मोडू पहाताहेत...

माझेच, माझ्या अवती-भोवती असणारे !

 

म्हणतात, रक्तालाच रक्ताची किंमत असते !

पण मला नाही वाटत, माझ्या आईने पहिल्यांदा माझे रक्त पाहीले असेल तेंव्हा,

काळजीपेक्षा तिच्या मनातील प्रेमाची जागा भीतिने नक्कीच घेतली असणार !

कारण त्याक्षणापासून आवळले जाणारे नजरांचे फास,

माझ्या मनाभोवतीही करकचवून आवळून जावेत आणि त्यांनाही त्यांची दहशत बसावी,

याची खचितच त्या सर्वांनी खबरदारी घेतली असणार !

   

का माहित नाही पण आजकाल,

श्वास घेतानाही मला परवाणगी घ्यावी का ? असे वाटते.

उगाच आपल्यामुळे आपल्या घराण्याची अब्रू नको ना जायला !

सालं या अब्रूचंही गणित आजतागायत समजलं नाहीये मला !

मुलगानामक लिंगानं कितीही झक्कमारी केली तरी तो दिवटा घराण्याचं नाव रौशनच करणार,

असा समज करून धन्य झालेल्या कुळ्यांची अब्रू नेमकी होती तरी कुठं ?

कोण म्हणतं त्यावेळी अब्रू चार भिंतींच्या खोल्यांमधून कैद होतं !

 

“चार भिंतींचं मोठं कुंपण,

घराच्या चार भिंती.

कोपर्‍यातल्या त्या खोलीच्याही चारच भिंती.

त्या खोलीच्या कोनाड्यात,

चेहर्‍यावर पदर ओढून फुंकणीने,

धुमसणार्‍या त्या चुलीमधला,

विस्तव पेटवण्याच्या प्रयत्नात होती ती.

पण, तिच्या मनातला विस्तव मात्र,

कुंपण, घर, खोली यांच्या, चार चार भिंतींआड,

पदराखाली झाकून ठेवत होती ती.”

 

ही तिच होती का ती अब्रू ?

बहुतेक असावी !

आजकाल मी साडी नेसत नाही...

कधीतरी चुडीदार आणि एरवी जिन्स !

मग आता पदर घ्यायचा कसा ?

हं ! म्हणूनच आईच्या काळी ओढणी आणि आजच्या आमच्या काळात स्कार्फ असावा !

प्रश्न अब्रूचाच आहे ना शेवटी !

 

सर्वांच्याच अपेक्षांना मिरवता मिरवता,

आता मीच माझी स्वप्नं हरवून बसलीये...

मीच स्वत:ला माझ्यामधेच कुठेतरी गमवून बसलीये...!

जागताना भीति वाटयीये...

जगतानाही भीति वाटतीये !

 

बापरे ! डोळ्यात पाणी उभं राहिलंच कसं !?

मुलगी आहे ना मी ! मी ग्लॅम-डॉलच दिसायला हवं !

समाजाची तशीच अपेक्षा असते ना !

जावं टॉयलेटमधे आणि कुणी डोळ्यातील पाणी पहाण्याधी,

तोंड धुवून मस्कारा आणि कन्सिलरच्या मुखवट्यामागं,

गाडून टाकावं स्वत:लाच आणि उसन्या चेहर्‍याने..

गाडून टाकावीत लक्तरं स्वत:च्याच असण्याची !

कारण,

डोळे उघडले तेंव्हा लक्षात आलं...

निर्मात्यानं माझी निर्मीती केली तेंव्हा,

खूप मोठी चूक करून बसला होता...

मला मुलगी बनवून साल्यानं,

माझ्यावरती सूड उगवला होता !

 

-अनुप

 

COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will be found that, anyone involved in such activities without prior permission, then, we are able to take certain charge on him/her. 

Pen Image

Pen Index