Pen


PEN 46 : चित्रपट मनातला आणि पडद्यावरचा ! : 1 Smoking Zone

वाचकहो, चित्रपट हा माझ्यासाठी नेहमीच आवडीचा, उत्सुकतेचा, जिद्न्यासेचा आणि कुतूहलाचा विषय बनून राहिला आहे. करिअरसाठी इतर बरेचसे ऑप्शन्स असतानाही, आपण फिल्म मेकरच व्हायचं ! हे मी लहानपणीच ठरवलं होतं. कॉलेजात शिकत असताना, इतरांना वाटतं तसंच मलाही वाटायचं की, चित्रपट काय कुणीही बनवू शकतो. आणि चित्रपट पाहून आल्यावर चित्रपटातील चुका, उणीवा शोधण्यात एनर्जी खर्च करायचो. पण, जेंव्हा मी माझा पहिला लघुपट बनवला तेंव्हा मला खर्‍या अर्थानं जाणीव झाली की, काठावर बसून खाडीत पोहोणार्‍याला शहाणपण शहाण्या माणसाने कधीच शिकवू नये ! ही “अक्कल” येण्यात माझ्या मोठ्या भावाचा अर्थात ‘डॉ. आलोक जत्राटकर’ चा खूप मोठा वाटा आहे. आपणापैकी बहुतांशी जणांना माहिती असेल की तो माझा “आयडॉल” आहे आणि सर्वात मोठा “क्रिटीक”, त्यामुळं एक होतं, माझ्या डोक्यात सहसा कुठलाही पुरस्कार मिळो किंवा कांहीही होवो, हवा जात नाही ! तर मुद्दा हा की, चित्रपट पहावा कसा ? तद्दन व्यावसायिक चित्रपटांना “सो कॉल्ड” समिक्षक शिव्या घातल असताना, त्यातही काय पहावं ? काय घ्यावं ? हे त्यानं शिकवलं. परदेशातील चित्रपटच चांगले, व्यावसायिक चित्रपट वाईटच हे ठसलेलं खूळ त्यानं काढून टाकलं. त्यामुळं आजही चित्रपट पहायला गेल्यावर मी माझा चष्मा घेवून जात नाही, नवीन काय मिळतं ते शोधण्याचा प्रयत्न करतो. नुकताच मी “जजमेंटल है क्या ?” हा चित्रपट पाहून आलो. चित्रपट संपल्या-संपल्या एक कॉलेजवयीन कन्या उभी राहिली आणि सर्वांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाली, “क्या च्युतिया फिल्म बनाई है ! कितनी बोअरिंग थी यार !!” त्या तरुणीच्या वाक्यावर सारेच हसले आणि कांही हौशी तरुणांनी टाळ्या पिटूनही दाद दिली. मी कांहीतरी बोलणार इतक्यात माझ्या मित्राने हात पकडला आणि नको म्हणून मान डोलावली. फिल्मवर उगाचच कोणी अक्कल नसल्यासारखं किंवा सर्वद्न्य असल्यासारखं बोलू लागलं तर माझं सटकतं, हे माझ्या जवळच्यांना ठाऊक आहे, त्यामुळे जेंव्हा कधी कुठेही सिनेमावर, लघुपटांवर घोळक्याने चर्चा होतात, तेंव्हा माझे मित्र मला बाजूला घेवून जातात किंवा अशा कार्यक्रमांना जावूच देत नाहीत. वरच्याच चित्रपटाचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर, ज्या कथेची नायिकाच तिच्या वेगळ्याच दुनियेत रहाते, तिच्यासाठी प्रत्येक क्षण कसा असू शकतो, हे दिग्दर्शक व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न करत होता आणि तो उत्तम होता. जोवर आपण त्या पात्राच्या ठिकाणी राहून चित्रपट पहात नाही, तोवर तो चित्रपट आणि बिटनेन दी लाईन्स कळतच नाहीत आणि नेमकं हेच दाखवण्याचा तो प्रयत्न होता ! पण, नाही आपल्याला तर सरळ साधे, विचार करायला न लावणारे, “एंटरटेन्मेट एंटरटेन्मेट एंटरटेन्मेट” असणारेच चित्रपट चालतात आणि परदेशातील चित्रपट पाहून थिएटर बाहेर पडलो की, “सालं आपल्याकडे असले चित्रपट होतच नाहीत !” असे शेरे मारून रिकामे होतो. पण, आपल्याकडच्या प्रयत्नांची पाठराखण करायला मात्र कुणीच पुढे होत नाही !

            म्हणूनच माझा हा एक छोटासा प्रयत्न ! य नवीन सदरातून मला भावलेल्या तद्दन व्यावसायिक असो, आर्ट फिल्म्स असोत वा इतर त्यांच्यातील “बिटवीन दी लाईन्स” मला जे उमगले ते (जे कदाचित मेकर्स दृष्टीने चुकीचेही असू शकतील !) लिहीण्याचा प्रयत्न करणार आहे. निदान आपणापैकी एक जरी व्यक्ती चित्रपट पाहून आल्यावर “श्शी ! फातलू पिक्चर होता..” असं म्हणण्यागोदर निदान एकदा जरी विचारप्रवृत्त झाला तरी खूप ! पहिला चित्रपट कोणता घ्यावा, याचा निर्णयच होत नव्हता. बराच विचार केला. माझ्याकडे जवळपास जगभरातले अडीच हजार चित्रपट आहेत, ते सारेच डोक्यात पिंगा घालू लागले आणि मग मनात विचार आला, माझाच एक लघुपट जो माझ्या मनाच्या जवळचा आहे, माझा सर्वात आवडता लघुपट आहे, त्यानेच सुरूवात का करू नये ? “स्मोकिंग झोन” या लघुपटाला बरेच पुरस्कार मिळाले, सिक्वल असणारा एकमेव लघुपट आणि लिहीत असतानाच हक्क विकले जाणाराही पहिलाच ! मागच्या आठवड्यात एके ठिकाणी सहज म्हणून हा लघुपट दाखवण्यचा योग आला आणि माझ्या “स्मोकिंग झोन” प्रेमाने उचल खाल्ली ! या लघुपटाला ४ वर्षे होवून गेली आणि त्यावेळी फेसबुक च्या पोस्ट साठी लिहीलेले आर्टीकल, जे मी फेसबुक वापरणे बंद केल्यामुळे, गेल्या कांही वर्षांपासून तसेच पडून होते, ते शेअर करत आहे. आपल्यापैकी किती जणांनी हा लघुपट पाहिला आहे माहित नाही, पण ज्यांना हवा असेल त्यांना त्याची डि.व्हि.डी. पोहोच केली जाईल !   

            आणि सर्वात महत्वाचे ! वाचकहो, मागच्या “दर्पण” या पेनला जो भरभरून आपण प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. पेनला आत्तपर्यंतचे सर्वात जास्त हिट्स मिळवून दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद !!!

------------------------------------------------

 

स्मोकिंग झोनच्या निमीत्ताने :

स्मोकिंग झोन प्रदर्शित होवून महिना उलटला तरी, आजकाल जो भेटतो तो मला या लघुपटाचा अर्थ विचारत आहे. तसा हा लघुपट बोजडच आहे म्हणा, त्यामुळे इतरांच्या प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण काल टिममधील एक व्यक्ति ऑफिसवर आली. बराच वेळ कांही बोलेना. खोदून खोदून विचारले तेव्हा ती व्यक्ति म्हणाली, “लोकांना फिल्म दाखवायला नको वाटतंय.” यावर “ का ?” विचारलं. उसासा सोडून ती व्यक्ति म्हणाली, “लोकं अर्थ विचारतात....काय डोंबल सांगू....!” त्या व्यक्तिच्या या उत्तरावर माझं मलाच हसू आलं आणि आपणच या फिल्मचा अर्थ फोडून सांगूया असा विचार केला. त्यासाठीचा हा घाट....

“स्मोकिंग झोन” म्हणजे काय ?

१९४१ साली अल्बर्ट कॉमस किंवा कामू या लेखकाने “द मिथ ऑफ सिसीफस” नावाचे पुस्तक लिहीले आणि साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली. या पुस्तकात कामूने एब्सर्डिटी वर भाष्य केले होते. या विचाराने प्रेरित होवून मार्टीन एस्लिन या विचारवंताने “दी थिएटर ऑफ एब्सर्ड” ची रचना केली आणि नाट्यक्षेत्रात क्रांती झाली. नाटक, कथा, कविता तरुणांची भाषा बोलू लागले, त्यांचे विचार, त्यांचे भाव-विश्व, नैराश्य, आनंद, जीवनाविषयीचा दृष्टीकोण याबद्दल उघडपणे बोलू लागले.

काय होती ही संकल्पना ?

पहिल्या महायुध्दानंतर आणि दुसर्‍या महायुध्दाच्या अगोदर जगामध्ये अनिश्चततेची भावना पसरली होती. आयुष्याची खात्री कुणालाच देता येत नव्हती. भविष्य, भवितव्य यांचे अस्तित्वच पुसले जाणार की काय अशी भीति तरुणांच्या मनात होत्ती. बेकारी, गरिबी, नैराश्य, भ्रष्टाचार, युध्द, रक्तपात यामुळे आपल्या आयुष्याकडे, अस्तित्वाकडे तरुण भावनिक पातळीऐवजी खूप प्रॅक्टिकल विचार करू लागला आणि त्याला जीनवात असणारी निरर्थकता जाणवू लागली. एब्सर्ड चे डिक्शनरी मिनींग “रिडीक्युलस” असे असले तरी याचे वर्णन करताना, “दी परफेक्ट हार्मनी ऑफ डिस-हार्मनी” किंवा “आऊट ऑफ हार्मनी” असं केलं जातं. जीवनाची निर्थकतता या विचारातून अधोरेखित केली जाते. नेमका काय आहे हा विचार ?

कामू म्हणतो, जेंव्हा स्त्री आणि पुरूष संभोगासाठी एकत्र येतात तेंव्हा त्यांच्या मनात “आपल्याला अपत्यं जन्माला घालायची आहेत” असा विचार कधीही नसतो. त्या क्षणी त्या दोघांनाही आपापली काम-वासना शमवणं हीच गरज वाटत असते. मग, जर कोणत्याचं उद्देशाविना आपला जन्म होतो आणि आपले कोणतेच उद्देश पूर्ण न होता जर मृत्यू येत असेल तर हे आयुष्य निरर्थक नाही काय ? असा प्रश्न कामूने उपस्थित केला. आजच्या तरुणांमध्ये ही भावना वाढीला लागलेली दिसून येते. पण थोडासा एंगल वेगळा आहे. “आहे हा क्षण जगा...कोणाचाही विचार न करता. काय माहित उद्या काय होणार आहे?” यातून चैनखोरीचीवृत्ती, जबाबदारी टाळण्याकडे असणारा कल, सेक्सकडे पहाण्याचा विकृत होत चाललेला दृष्टीकोन, स्त्री म्हणजे फक्त भोगवस्तू, पैसा म्हणजेच सर्वस्व, धर्म निव्वळ एकमेकांत फूट पाडण्यासाठी आणि मोक्ष फक्त स्व हित साधण्यासाठी असे चित्र आपल्या समोर आज उभे रहात असलेले दिसत आहे.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांची निर्मीती मनुष्याच्या हितासाठी करण्यात आली होती. मनुष्याने या चार पुरूषार्थांचा योग्य वापर करून आपली उन्नती साधावी असा प्रामाणिक हेतू होता. मनुष्य केंद्रस्थानी होता आणि या चार गोष्टी मनुष्याभोवती मनुष्यासाठी फिरत होत्या पण, आज चित्र पालटले आहे. या चार पुरूषार्थांना अवाजावी महत्व आलेले दिसत आहे. आज मनुष्य यांच्याभोवती, यांच्यासाठी फिरताना दिसत आहे.

लघुपटातील चार पात्रे या चार पुरूषार्थांचे प्रतिनिधीत्व करतात. मोक्ष या पात्राखेरीज सारी पात्रे आपापली बाजू मांडत आहेत. यांच्या मते, त्यांच्यावर खूपच अन्याय झालाय, त्यांना कुणीच समजून घेत नाही (असे आपल्यातील प्रत्येकालाच वाटते) या भावनेतून ते टोक गाठताहेत. पण हे टोक ते अचानकपणे गाठत नाही किंवा आपल्यापैकी कुणीच एकदम टोक गाठत नाही. टोकाचा निर्णय घेण्यागोदर आपल्या मनात कांही प्रोसेस सुरू असतात. काय असतात या प्रोसेस ?

बॉदलेअर नावाचा एक खूप मोठा कवि आणि विचारवंत होवून गेला. त्याने आपल्या कवितांमधून मानवी मनातील भावनांच्या गुंतागुंतीच्या प्रोसेस खूप चांगल्या पध्दतीने उलगडून दाखवल्या आहेत. त्याच्या सिध्दांतानुसार आपल्या कृतीमागे किंवा निर्णय घेण्यामागे तीन प्रकारच्या स्टेप्स असतात. एक, इन्नुई. इन्नुई म्हणजे “बोअरडम”. पण हे बोअरडम संकुचित अर्थाने न वापरता तो हा शब्द मोठ्या स्तरावर वापरतो म्हणजेच, आयुष्याच्या रहाटगाडग्यात अडकलेला माणूस आणि त्याच्या त्याच-त्याच प्रेडिक्टेबल कृती आणि याच प्रेडिक्टेबल आयुष्यातून निर्माण होणारा बोअरडम. या इन्नुईचा जेंव्हा अतिरेक होतो तेंव्हा त्याचे रुपांतर “स्प्लिन”मध्ये होते. “स्प्लिन” म्हणजे एक्स्ट्रिम बोअरडम (टोकाचा कंटाळवाणेपणा) या स्टेजमध्ये आपण नेहमी टोकाचे निर्णय घेत असतो आणि हमखास चुकीचे निर्णय याच एक्स्ट्रिमीटीमध्ये घेतले जातात. यानंतर जी स्टेज असते ती म्हणजे, “डॅंडी”. डॅंडीजम म्हणजे “टू अरेंज अग्ली थिंग्ज इन अ ब्युटीफूल मॅनर” अर्थात यावेळी आपण आपल्या चुकांचे समर्थन उदात्त पध्दतीने करू लागतो आणि आपली चूक ही योग्य कशी होती किंवा परिस्थितीनुरूप हिताची कशी होती हे पटवून देवू लागतो. लघुपटातील मोक्षाव्यतिरीक्त तीन पात्रे आपापल्या चुकांचे, चुकीच्या विचारांचे समर्थन देत आहेत आणि त्यांच्या मते तेच योग्य असून जग त्यांना समजून घेण्यात चुकत आहे.

मोक्षाचे पात्र कांहीच बोलत नाही किंवा कोणतीच प्रतिक्रीया देत नाही. त्या पात्राच्या चेहर्‍यावर अजिबातच भावना दिसत नाही आणि या पात्राचा चेहराही लहान आहे. मुळात मोक्ष काय ? कुणालाच माहित नाही, नीटसा कळलेला नाही पण तरिही आपण त्याला व्यक्तच होवू देत नाही. आपण सांगत आहोत तोच मार्ग मोक्षचा, त्याव्यतिरिक्त असूच शकत नाही. भूतदया किंवा निसर्गावर प्रेम, परोपकार यात मोक्ष नसून तो फक्त चारधाम, मक्का, गया, रोम, जेरुसालेम यापुरताच मर्यादीत ठेवला आहे. खरे रूप जाणून घेण्याची कुणालाच ईच्छा नाही. लहान मुलांकडे “नेचर्स प्युरेस्ट फॉर्म” म्हणून पाहिले जाते आणि लघुपटातील मोक्षाचे पात्र साकारणारी एक लहान मुलगीच आहे. मग मुलगीच का ? कारण स्त्रीकडं नव-निर्मीतीची क्षमता असते. जगातील किंवा निसर्गातील प्युरेस्ट फॉर्मची निर्मीती फक्त मादीच करू शकते !

लघुपटात एक रखवालदार आहे. वर वर तो खूप शांत आहे पण त्याच्या मनात खळबळ माजली आहे. मनुष्याच्या अस्तित्वाबद्दलच त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. मनातील गुंता तो वरकरणी शांत वाटणारा रखवालदार सोडवू पहात आहे. कोण आहे हा रखवालदार ?

 महान संशोधक फ्रॉईड याची “ड्रिम थेअरी” उदयाला आली आणि सगळीकडे गदारोळ माजला. त्याच्या फॅलिक सिल्बॉल थेअरी, सेक्स थेअरी आणि इनर-माईंड थेअरीजनी लोकांना विचार करायला प्रवृत्त केले. त्याच्या सिध्दांतानुसार, आपल्या मनाचे दोन कप्पे असतात कॉन्शयस आणि सब-कॉन्शयस माईंड अर्थात जागृत आणि निद्रीस्त मन. आपण आपल्या जागृत मनाचा निव्वळ २०% भाग दैनंदिन जीवनात वापरत असतो. दिवसभरात आपण जे पहातो त्यातील २०% गोष्टीच आपल्या लक्षात रहातात पण मग बाकीच ८०% गोष्टी जातात कुठे ? तर, त्या निद्रीस्त मनात जात असतात. संमोहन अवस्थेत आपण, इतरवेळी न जाणवणार्‍या ८०% गोष्टींची अनुभूती घेवू शकतो आणि देवूही शकतो. जागृत मनाचेही फ्रॉईडने तीन भाग पाडले आहेत. इद, इगो आणि सुपराइगो.

सुपर-इगो मध्ये आपल्या सार्‍या दमित भावना असतात. ज्या गोष्टी समाजाने अनैतिक, चुकीच्या, विघातक मानल्या आहेत तरी ज्या करण्याची आपल्या मनात भावना उत्पन्न होत असते, ती भावना सुपर-इगोमध्ये दाबून टाकल्या जातात आणि स्वप्न अवस्थेत आपण या सुप्त भावनांची पूर्ती करून घेत असतो. इगो हा आपला मुखवटा असतो. आपण समाजमान्य पध्दतीने वागत, बोलत, आचरण करत असतो, हा एक प्रकारचा मुखवटाच असतो. आपले हे वागणे नाटकी आणि समाजाचा रोष ओढावून न घेण्यासाठीचे असते. आणि आता सर्वात महत्वाचे म्हणजे “इद”. इदला आपल्या मनाचा रखवालदार म्हंटले जाते. कोणत्या गोष्टी इगोमध्ये जाव्यात आणि कोणत्या सुपर-इगोमध्ये जाव्यात किंवा कोणत्या जागृत मनात आणि कोणत्या सुप्त मनात जाव्यात हे ठरविण्याचा अधिकार इद ला असतो. कधी कधी आपल्या चुकीच्या वर्तनाबद्दल आपल्या मनात बोचणी लागते. ती बोचणी देण्याचं काम इद करत असतो.

“स्मोकिंग झोन” मधला रखवालदार नेमकं हेच करतो. तो प्रत्येकातील सुप्त मनाला, जो बांधून घातला गेला आहे, ज्याचे डोळे बंद केले आहेत मात्र कान उघडते आहेत, डिवचत आहे आणि वर-वर जरी कुणी मान्य करत नसला तरी प्रत्येकाच्या आत वेदना आहेत, कांहीतरी चुकीचं घडल्याची बोचणी आहे. तो रखवालदार टोचण्या देवून बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाचे जागृत मन मुखवटा पांघरून “झोन” मध्ये जाते, रखवालदार सुप्त मनाला टोचण्या देतो आणि सुप्त मनातून जळणारा सुपर-इगो कबुली देतो पण ही कबुली सर्वांसमोर नाही, हे महत्वाचे ! कारण तितके धाडस मुखवट्यात जगण्यार्‍या “आपल्यात” नाही.

लघुपटात सुरूवातीपासून शेवटपर्यंत एक मुलगा कांहीतरी लिहीत आहे, विचार करत आहे, प्रत्येकाला बोलतं करत आहे. कोण आहे तो मुलगा ? त्या मुलामागची काय संकल्पना आहे ?

प्लेटो ने आपल्या “रिपब्लिक” नामक विवेचनात “आयडियल स्टेट” ची संकल्पना मांडली आहे. त्या जगात कोण-कोण असावेत ? याचे सार त्याने मांडले आहे पण प्लेटोने या त्याच्या आयडियल राज्यात कवींना मात्र मज्जाव केला आहे. त्याच्या मते, कवी नवीन कांहीच करत नाही. जे अंतिम सत्य आहे त्याची तो नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर, “आयडिया ईज ट्वाईस रिमूव्हड फ्रॉम रिएलिटी एन्ड पोएट्री ईज इमिटेशन ऑफ इमिटेशन” अर्थात कवी-कल्पना ही वास्तवाची तिसरी शक्यता असते आणि कविता ही मूळ कल्पनेच्या नकलेची नक्कल असत्ते. उदाहरण द्यायचे झाले तर, एखादा चित्रकार आंब्याचे चित्र काढत असेल तर, तो चित्रकार जो आंबा पहात आहे त्याची प्रतिमा प्रथम त्याच्या मन:पटलावर तयार होते आणि मग ती कुंचल्यातून साकार होते. पण मुळात झाडावर जो आंबा आहे तोच मुळात निर्मात्याच्या मनातील कल्पनेतून साकार झालेला असल्याने, मूळ कल्पनेची तो आंबा नक्कल आहे आणि चित्रकार तो आंबा पाहून त्याची नक्कल त्याच्या मनात तयार होते आणि मग ती साकार होते. त्यामुळे कोणतीही निर्मीती “नव-निर्मीती” असू शकत नाही, असे प्लेटोचे म्हणणे होते.

 लघुपटातील हा मुलगा म्हणजेच मूळ कल्पना साकारणारा निर्माता आहे आणि घडणारे कथानक त्याच्या एकट्याच्या मनात घडणारे असून त्याला, पर्यायाने आपल्या सर्वांना अस्वस्थ करणार्‍या विचारांचे वैश्विक प्रतिनिधीत्व करणारे आहे. आजच्या तरुण पिढीचे तो मुलगा प्रतिनिधीत्व करत आहे. बर्‍याचदा आपण म्हणत असतो की, आपले आयुष्य दुसरे कुणीतरी लिहीत असते. या लघुपटातील पात्रांच्या बाबतीत हेच आहे. तो मुलगा त्यांचे आयुष्य लिहीत आहे, त्यांना बोलतं करत आहे. लेखक-कवींना दुसरा निर्माता म्हंटलं जातं. ते त्यांच्या शब्द-सामर्थ्यावर नवीन विश्व तयात करतात. लघुपटातील हा मुलगा निर्माता अर्थात लेखक आहे आणि तो आपल्या पात्रांना बोलतं करून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मग आता रहता राहतो प्रश्न एकच....लघुपटाचे नाव “स्मोकिंग झोन” का ? आपण प्रत्येकाने आपल्या मनात एक “झोन” तयार केला आहे. या झोनमध्ये कुणाला प्रवेश नाही आणि आपणही आपल्या “झोन” मधून बाहेर येवून जगाकडे तटस्थपणे पहाण्यास तयार नाही. पूर्वग्रहांचा, सार्‍या नकारात्मक भावनांचा, शंकांचा आणि अनिष्ठ चिंतनाचा स्मोक...धूर आपण तयार करून त्याच दाट धूराच्या पडद्याआड सुरक्षित आपल्या झोनमध्येच रहाणं पसंत करतो. जोवर आपण हा धूराचा पडदा बाजूला करून आपल्या झोनमधून बाहेर पडून एकमेकाकडे “माणूस” म्हणून पहात नाही तोवर “मनुष्य” म्हणून जगण्यात आपण नक्कीच कुठेतरी कमी पडतोय हे नक्की !!!

 

-अनुप

Pen Image

Pen Index