Pen


PEN 48 : पाचवे पान

लिहून सारं रितं व्हावं म्हणतो...

मनामधल्या हिंदोळ्यांना त्यांचा गाव द्यावा म्हणतो !

भरकटलेल्या शब्दांना शिस्त लावावी म्हणतो...

शिस्तबद्ध भावनांना स्वैर सोडावे म्हणतो !

काळजामधे अडकलेल्या भूतकाळाला,

वर्तमानाच्या कागदावर उगाळावे म्हणतो...

आजच्या स्वप्नांना मनी कैद करावे म्हणतो !

आसवांच्याही गीतांचे गद्य करावे म्हणतो...

गद्यांमधल्या पात्रांना मुक्त करावे म्हणतो !

स्वत:मधल्या मलाही पानांमधून शोधावे म्हणतो...

मनामधल्या हिंदोळ्यांना त्यांचा गाव द्यावा म्हणतो !

 

            रसिक वाचक मित्रहो, मन:पूर्वक नमस्कार ! गेला रविवार (२४ नोव्हेंबर २०१९) माझ्यासाठी आनंदाचा आणि बरेच वर्ष अपूर्ण स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान सार्थ करणारे होते. आणि या सार्‍यामध्ये आपल्या सर्वांचे खूप मोठे योगदान आहे. वाचकहो, गेल्या रविवारी माझ्या, “निष्पर्ण पिंपळाच्या छायेत” या एकांकिका संग्रहाचे २४ व्या कारदगा साहित्य संमेलनात प्रकाशन झाले. कित्येक वर्षांचे रखडलेले स्वप्न पूर्ण झाले. साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही सर्व टिमने मिळून इंटर-रिएक्टिव्ह वेब-साईट बनवण्याचे ठरवले आणि त्यानंतर अगदी कमी कालावधीतच गुगलच्या टॉप टेन इंटर-रिएक्टिव्ह वेब-साईटमधे आपण सर्वांनी ही वेब-साईट पोहोचवलीत ! कोणतीही पब्लिसिटी न करता १०,००० फॉलोअर्सचा टप्पा आपण सर्वांनी मिळून पार केला, ही माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. आपण सर्व वेळात वेळ काढून “पेन” वाचता आणि माझ्याशी संपर्क साधून त्याविषयी चर्चा करता, हे तर “चेरी ऑन टॉप” च म्हणावे लागेल ! आपल्या या मिळणार्‍या प्रोत्साहनामुळेच मला लिहायला प्रेरणा मिळते, असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. पेनवरील “निष्पर्ण...”, “कंकाली” या एकांकिकांना आपण जो प्रतिसाद दिलात त्यामुळेच पुस्तकाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी गेले ७ महिने आम्ही सारे झटत होतो आणि त्याच प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे, याचा खचितच आनंद आहे.

            आपणापैकी बरेच जण प्रेमळ तक्रार करतात की, हल्ली मी रेग्युलर पेन लिहीत नाही ! याबद्दल मी आपणा सर्वांची माफी मागतो. एकतर या संग्रहाचे काम, “रामजी” या आगामी कादंबरीचे, “रंग:गहिरे फसवे” या आगामी कवितासंग्रहाचे लेखन, एका मराठी वेब-सिरीजसाठीचे लेखन, स्टुडियोमधील एडिटीं-रेकॉर्डींगची कामे, जाहिराती-माहितीपटांसाठीची कामे आणि पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या माझ्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी या सार्‍यामुळेच मला थोडा वेळ मिळत नाही, ही खरे असले तरी त्यातूनही कांहीतरी लिहीण्याचा माझा प्रयत्न असतोच. पण बरेचदा मला ते आवडत नाही किंवा माझ्या जवळच्या लोकांना रुचत नाही आणि त्यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय ते टाकणे उचितही वाटत नाही, यामुळे दिरंगाई होते हे मान्यच ! पण मी नक्कीच प्रयत्न करेन...

            वाचकहो, पुढील रविवारपासून “राहुट्या” ही दीर्घकथा पेनवर टाकण्याचा माझा प्रयत्न असेल. ती वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवाल ही आशा !

            वाचकहो, आपणांस जर “निष्पर्ण पिंपळाच्या छायेत” हे पुस्तक हवे असेल तर संपर्क साधा किंवा पहिल्या टप्प्यात कोल्हापूरात ते “तेजस प्रकाशन, ट्रेड सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर” येथे उपलब्ध असेल. लवकरच महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत !

-अनुप

 

 

ता.क. : वाचकहो, गेल्या अडीच वर्षात मी ‘फेसबुक’ या सोशल मिडीया साईटवर जाणे टाळले होते पण

मित्रांच्या प्रेमळ रोषाला बळी पडून मी नव्याने पुन्हा ‘फेसबुक’ या सोशल मिडीया साईटवर सक्रिय झालो आहे. आता आपण सारे तिथेही नक्कीच भेटू शकू. तुमची वाट पहातोय...

Pen Image

Pen Index