धन्यवाद !
धन्यवाद !! धन्यवाद !!!
वाचकहो,
आपणा सर्वांना
नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. या नव्या वर्षात आपल्या सर्व मनोकामना, संकल्प
पूर्ण होवोत, हीच सदिच्छा. अगदी सुरूवातीलाच आपले आभार मानल्यामुळे कदाचित आपण
बावचळून गेला असाल ना ? तुमच्या सर्वांचे आभार मानावे तितके कमीच आहेत ! आपल्या
सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहनामुळेच आपण सर्वांनी मिळून १० हजार फॉलोअर्सचा
टप्पा पार केला आहे. अल्पावधीतच आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिलात, त्यासाठीच हा
आभार-प्रपंच. येत्या १ फेब्रुवारीला वेब-साईट सुरू करून ३ वर्षे पूर्ण होताहेत आणि
याच निमीत्ताने कांही बदल करण्याचा मानस आहे. एक तर, पूर्ण लूक बदलणे आणि “पेन” हे
सदर इंटर-रिएक्टिव्ह करणे हे दोन महत्वपूर्ण बदल असणार आहेत आणि सध्या मी आणि माझी
टिम त्याच कामात आहोत. लवकरच सर्व टेस्ट्स आणि प्रयोग पूर्ण करून लवकरच आपल्या
सेवेत रुजू होवू. पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या खूप सार्या शुभेच्छा आणि धन्यवाद !
पेन : कांही ओळी मनातल्या 10 :
वाघुल्या
अन हुश्शार
रातीला, आबुळाच्या फटीतनं साद ऐकू आली...
“वाघुल्या
येणार...वाघुल्या येणार...”
किलकिल्या
फटीतनं, घाबरल्याल्या नजरा,
बुबूळं फाडून,
घुप्प आंदारात...
वाघुल्या
दिसतो का ह्येचा अंदाज घेत, घाबर्या मनानं...
अन लबकणार्या
काळजानं, एकमेकाला धीर देत...
घुप्प
अंदारातून एकांदी आरोळी नाईतर सुस्कारा ऐकू येतो का ?
नाईच आला तर
ठिक, पर आला तर...
आपला लंबर कवा
? ह्येची वाट बगन्याबिगर दुसरा पर्यावच नवता !
त्योच
पुन्यांदा साद ऐकू आली....
“वाघुल्या
आला....वाघुल्या आला !”
बगता बगता दार
थाड थाड बंद जाली...
बाया-बापड्यांनी
काळजाच्या ठोक्यांस्नी वेसन बी लावली !
बापे
पोरा-ढोरांला घेवून रानातनं वाट दिसल तितनं...
व्हट शिवून,
पाय हातात धरून पोबारा करू लागली !
बोंडाला लुसलुसू
लागलेल्या तान्हुल्यांच्या नरडीला,
आया-बायांनी
नदरतलं पानी, नदरत आडवतच नकं लावली !
आजवर कवा
गावात न घुसल्याली म्हसनातली कोल्ली,
हुंबरान
हुंबरा हुंगत, चेकाळल्यावानी केकाटत रस्त्यावरनं फिरणार्या कुत्र्यास्नी
बोचकारत...
अन दिसल त्या
कुत्रीला ढेंगंखाली घेत...
एकमेकाचच लचकं
तोडू बगत हुतीत !
म्हसनातल्या
घाबरल्याल्या मड्यांनीबी मग धीर करून सोताच साद दिली...
“वाघुल्या
आला...वाघुल्या !”
गपगार
निजलेल्या मळ्यामदल्या हिरीतनं धबाक धबाक आवाज येवाय लागलं.
सोईची जागा
वाटून रानात पोबारा केलेल्या बाप्यांनी,
हिरीतनं धडाधड
उड्या घितल्या.
कोन पारंबीला
धरून वर चडू लागला...
तर कोन,
झाडावरची गर्दी बगून उडी मारून दुसरा आडोसा शोदू लागला.
त्याच
पारंबीच्या झाडाजवळ आजवर कुणीच फिरकला नवता.
दर आमावशेला
अन पुनवंला निवीद घेऊन मातूर समदा गाव सांच्याला,
त्या
पारंबीच्या झाडाभवती गर्दी करू लागायचा.
त्या झाडावर
म्हणं, गाव वसायच्या आदुगरपास्नं भुत्या र्हायाचा...
अन त्येला
दुकवायला नगो म्हणून समदा गाव...
अमवशा-पुनवंला
त्येच्या भवतीनं जमायचा !
आज गावाला
भुत्याची भीतिच वाटंना झालती...
भुत्याच
त्येंच्यातला एक व्हवून,
आडोशाला लपून,
आवाज बदलून वरडू लागत हुता...
“वाघुल्या
आला....”
येळ सरत चालला
तसा रातीला माज चडू लागला.
माजाला
आल्याला रेडा जसा फुरं फुरं करू सोडतो...
तसाच रातीला
चेव चडल्याला !
घामाचा वगळ बी
घाबरून तोंडावरनं सरन्याऐवजी...
पाठच्यानं
वगळू मातीत लपू लागल्याला !
गटारीबी भीतिनं
भिजून लिबलिबीत झाल्याला...
गोठ्यातल्या
जनावरांनीबी भिवून कवाच जीव सोडल्याला !
तांबडं
फुटायला आलं तवर समदा गाव गपगार हुता...
कोंबड्यांला
बांग देयालाबी घशात जीव नव्हता !
फटफटू लागल
तसं लोंढा उंबर्यांकडं परतू लागला...
वाटंवर
वाघुल्याच्या पाऊलखुणा दिसत्यात का ते हरेकजण शोदू लागला !
काल रातच्याला
बी कोनतर मजाक म्हनून साद दिलती वाटतं...
पर लई जीव
हाकनाक घिऊन रातीनं सोनं निग्तं लुटलं !
घाबरल्याली
मडी परत निपचित निजली...
पारंबीचा
भुत्या, आवंढा गिळून पार टोकावर जावून पाय पसरून पडला हुता !
हर घरातल्या
बाया रातभर पडलेल्या रगताचा अन घामाचा पाट,
कंबर कसू,
पुसू लागल्या हुत्या !
बापे पुना
दिसभर राबायला शेतात हजर...
चुली दिमाकात
दिसभर पेटायला तयार...
पोरं-ढोरं
पुना दिसभर उदळायला हुश्शार...
अन म्हसनाच्या
भिंतींवर रातभर उंडग्यागत फिरणारी कोल्ली...
जिबल्या चाटत
रातीची वाट बगत फुगल्याल्या पोटानं ऊन खात आडवी पडल्याली !
-अनुप
COGNIZANCE: All written creative material is the solemn property of “An Anup
Jatratkar Multi-Media Production”. If anyone wanted to use it for his/her own
personal purpose (i.e. short film, projects, blogs, articles, scripts, FB posts
etc.) then, have to take proper permission from, Mr. Anup Jatratkar. If it will
be found that, anyone involved in such activities without prior permission,
then, we are able to take certain charge on him/her.