Pen


PEN 50 :कांही ओळी मनातल्या 11: पोकळी, शोध आणि मी !

माहित नाही कधीपासून पण,

मनात माझ्या, माझ्यासह एक पोकळी भरून राहिलीये !

व्यापून टाकलाय भवताल माझा आणि...

गर्भार अंतर्मनाचा !

कदाचित निर्वातच असावी ती पोकळी, कारण..

मी दिलेली साद माझ्याही कानांना ऐकू नाही येत.

जोर लावून भिरकावलेला दगडही समोरच्या कठड्यावर आदळतो,

अन तरीही कोणताही प्रतिध्वनी गुंजत नाही कोणत्याही कोनाड्यात !

कृष्णविवरांप्रमाणं इथंही कुठलाच नियम लागू होत नाही.

बहुधा याच पोकळीत अगणित कृष्णविवरंही जन्म घेत असावीत...

कारण दिवसागणिक जड होत जाताना जाणवतेय ही पोकळी !

 

जन्माला येणारी आणि विलुप्त होणारी विवरांचं आताशा तसं नाविन्य राहिलं नाही म्हणा.

पण तरीही औत्सुक्य कमी होतच नाही ना !

सर्वांमध्ये असूनही एकटं भासवते ही पोकळी...व्याधाप्रमाणं बहुधा.

आलो कुठून ? जाणार कुठे ?

हाच असावा का अंतिम निसर्गदत्त प्रश्न ?

कांही का असेना या पोकळीनं एक शिकवलं मला...

आत खोलवर डोकावून पहायला.

अगदी खोल. खोल खोल आत. गर्भात !

त्याच पोकळीत अजूनही मी तसाच जाणवतो...

गर्भात असल्यासारखा, पाय मुडपून निजलेला !

मग भीतिही वाटते, बापरे ! पुन्हा जन्म घ्यायचा की काय ?!

नकोच ना !? खरच नको.

 

जन्माची तशी भीति नाही पण जन्मासोबत येणारी पोकळी,

तिचं करायचं काय ? ती तशीच राहिल...चितेनंतरसुध्दा !

ती भरून निघणारच नाही बहुधा !

एकदा एका मयतात समोर जळणार्‍या चितेला पहात असताना,

भास झाला ती पोकळी जळत असल्याचा ! भासच होता तो त्यावेळी.

ती कधीच जळत नाही, फक्त जागा बदलते...आत्म्याप्रमाणं, जर असेलच तो तर !

हे ही गृहीतकासारखं आहे ना ! जर...तर !!

मला आठवतंय, सातवीच्या वर्गात असताना जेंव्हा निर्वात पोकळीचा पाठ शिकवला जात होता,

आणि कानाला लावल्यानंतर त्यातून येणार्‍या वार्‍याचा घुंई घुंई आवाज...

पहिल्यांदा ऐकला, तेंव्हापासूनच मला माझ्यात दडलेल्या पोकळीचा पहिल्यांदा आंदाज आला होता.

घुंई...घुंई...घुंई...घुंई...

 

 लहानपणी सवंगड्यांसोबत असाच आवाज करत फिरवलेली अदृश्य गाडी...

आणि याच आवाजात साद देणारी पोकळी !

आवाज सारखाच पण...मनामध्ये उठणार्‍या तरंगांमध्ये किती ती तफावत !

रेझोनेटिंग ट्युबप्रमाणं...प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी...उठणारी आणि शमणारी वादळंही वेगळी !

बर्‍याचदा या पोकळीत रिती होत जातात शब्दंच्या शब्द !

निर्वातात म्हणे जीव तग धरूच शकत नाही.

तसं असेल तर या निर्वातात कित्येक जीव जगले, तरले, कागदावर आले आणि कधी कधी...

तर समोर येवून उभे राहिले अगदी हाडामांसासह !

पण त्यांनीही कधी ती पोकळी भरण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.

उलट पोकळी जास्तच रिती होत गेली...मोठी होत गेली, प्रचंड, भव्य, अवाढव्य होत गेली !

इतकी की माझ्याच उंबर्‍यात मलाच उपरा ठरवू लागली.

 

उपरेपणा हा ही याच पोकळीची देण...!

ज्याला कुणाला उपरा असल्याची जाणीव होते, त्या प्रत्येकात...

समजावं ही पोकळी भरून राहिलीये, वाढलीये !

डोक्यावरच्या पोकळीप्रमाणं ती ही दिवसागणित रुंदावतीये.

एक दिवस कधीतरी मग, इतकी मोठी होईल की शकलं करून स्वत:ची मरणमिठी घ्यावी किंवा

एक दिवस अचानक इतकी आकसेल आणि सामावेल एका बिंदूत...

स्फोट होवून जन्माला घालण्या कित्येक नव्या पोकळ्यांना !

 

मात्र मी वाट पहातोय तिसर्‍याच शक्यतेची...

ना कधी विस्तारेल, ना कधी आकसून बिंदूत सामावेल...

राहिल अशीच गिरक्या घेत, पिंगा घालत मनात सभोवार आणि घेवू शकेल शोध...

याच पोकळीतून जन्म घेणार्‍या अगणित पात्रांचा...सृजनाचा !

कारण एक गोष्ट नक्कीच उमगलीये...

जोवर ही पोकळी तोवर लेखणी आणि तोवरच मी !

हा शोध मात्र असाच निरंतर सुरू रहायला हवा...

चितेवरचा अखेरचा विस्तव विझेपर्यंत !

 

-अनुप

  

Pen Image

Pen Index